विविध अडथळ्यांची शर्यत पार करत गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसीच्या समावेशासह कोल्हापूर महापालिका हद्दवाढीचा प्रस्ताव गुरुवारी मंजूर करण्यात आला. महापालिकेची सहा महिन्यांची मुदत पाहता हा प्रस्ताव शासनाने मंजूर करून पंधरा दिवसात अधिसूचना काढावी, अशी मागणी सदस्यांनी केली. अधिसूचना न निघाल्यास हद्दवाढीसाठी जनआंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोल्हापूर महापालिका हद्दवाढीच्या प्रस्तावात शिरोली व गोकुळ शिरगाव एमआयडीसीचा समावेश यापूर्वी नव्हता. दोन्ही एमआयडीसींचा समावेश करावा म्हणून यापूर्वीची सभा तहकूब सभा करण्यात आली होती. प्रशासनाने दोन्ही एमआयडीसींसह अठरा गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव आज सादर केला. या प्रस्तावास सभागृहातील सदस्यांनी हात उंचावून मंजुरी दिली. महापौर तृप्ती माळवी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. आयुक्त पी. शिवशंकर उपस्थित होते.
शिरोली व गोकुळ शिरगाव हद्दीत येणाऱ्या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे, की संपूर्ण औद्योगिक वसाहतीचा, याचा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी शशिकांत मेथे यांनी केली. यावर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात सामाविष्ट असणाऱ्या नेर्ली, तामगाव, विकासवाडी व गोकुळ शिरगाव अशा संपूर्ण क्षेत्राचा यामध्ये समावेश केला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने खोत यांनी दिली.
हद्दवाढ प्रस्तावामध्ये केवळ औद्योगिक वसाहत असा समावेश न करता सर्व कारखान्यांचा समावेश असणारी यादी यामध्ये जोडली जावी. प्रशासनाने शिरोली व गोकुळ शिरगाव या गावांचा नकाशा दिला आहे. पण एकूण किती उद्योग यामध्ये समाविष्ट होतील याची यादी जोडावी, तरच संपूर्ण औद्योगिक वसाहतीचा समावेश यामध्ये होईल, अशी सूचना भूपाल शेटे यांनी केली.
हद्दवाढीबरोबर घनकचरा हा महत्त्वाचा मुद्दा येणार आहे. याचा विचार करून महापालिकेकडे असणाऱ्या टोप खणीचा या प्रस्तावामाध्ये समावेश करावा. शिरोलीच्या समावेशात या खणीचा उल्लेख आला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत घाटगे यांनी केली.
हद्दवाढीमध्ये समावेश होण्यासाठी विरोध असणाऱ्या ग्रामपंचायतींचा विरोध लक्षात घ्या. तेथील ग्रामस्थांना हद्दवाढीमध्ये समावेश झाल्यास त्यांचा होणारा विकास समजून सांगा. त्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न करा, अशी सूचना मधुकर रामाणे यांनी केली.
हद्दवाढीतील गावे
शिये, वडणंगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवेबािलगे, वाडीपीर, मेरेवाडी, पाचगाव, कळंबे तर्फे ठाणे, शिरोली, उचगाव,शिंगणापूर, गोकुळ शिरगाव, नागाव, वळीवडे-गांधीनगर, गडमुडिशगी, शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसी.