सिंधुदुर्गनगरीत डंपरचालक-मालकांनी सुरू केलेले डंपर आंदोलन मागे घेण्यात आले आहे, असे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी गुरूवारी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी डंपर व्यावसायिकांचे आंदोलन बेदखल ठरविले होते. जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सर्व डंपर चालक-मालकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभाग घेतला होता.
डंपर मालकांनी गेल्या शनिवारी सकाळपासूनच त्यांच्या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईचा त्रास होत असल्याचे सांगत डंपर मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दुपारच्या सुमारास सर्व डंपर मालकांचा जमाव नितेश राणेंच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून हा सर्व जमाव आत शिरला. यानंतर या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या आमदार निलेश राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. कणकवली न्यायालयाने काँग्रेस आमदार नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्यासह इतरांना आज न्यायालया हजर करण्यात येणार आहे.