महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. ऑनलाइन पद्धत्तीने जाहीर करण्यात आलेल्या या निकालात या वर्षी रायगडच्या निकालात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा एकूण निकाल ८४.१९ टक्के इतका लागला असून सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मुंबई विभागात दुसऱ्या क्रमांकावर असणारा रायगड या वर्षी पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. तर जिल्ह्याचा एकूण निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घटला.
या वर्षीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३० हजार १११ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यांपकी ३० हजार ८८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यातील २५ हजार ३३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण प्रमाण ८४.१९ टक्के येवढे आहे. मुलांच्या तुलनेत यंदाही मुली वरचढ ठरल्या आहेत. मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.५० टक्के इतके असून ७९.३१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
या वर्षी रायगड जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ८८.९२ टक्के इतका लागला असून या शाखेचे ८ हजार ६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचे ६ हजार ३८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचे शेकडा प्रमाण ७४.२५ इतके आहे. वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८८.०० टक्के इतके असून या शाखेचे ९ हजार ५३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचे ८१.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांची संख्या ७४३ इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात तब्बल ६ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे रायगडच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीसे निराषेच वातावरण आहे.
यंदाचा निकाल ८४.१९ टक्के इतका आहे तर गतवर्षीचा निकाल ९०.३६ टक्के इतका होता. या वर्षी विशेष श्रेणीत १ हजार १९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ६ हजार ८२०, द्वितीय श्रेणीत १५ हजार २६३ तर तृतीय श्रेणीत २ हजार ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुका निहाय निकालाचे वर्गीकरण केल्यास जिल्ह्यात सर्वात चांगला निकाल पनवेल तालुक्याचा लागला असून तालुक्यातील तब्बल ८९.५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर खालापूर तालुक्यातील निकाल सर्वात कमी लागला असून येथील ६४.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी खालापूर तालुक्याचा निकाल खराब लागला आहे.
दुपारी १२ वाजता निकाल ऑनलाइन जाहीर झाला. सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता आणि धाकधूक शिगेला पोहोचली होती. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती. मात्र सव्‍‌र्हर नेहमीप्रमाणे डाऊन असल्याने निकाल मिळायला उशीर होत होता. आता स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढल्याने सायबर कॅफेतील गर्दी तुलनेत कमी होती.

Untitled-4