आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव कमी असले आणि गाठी निर्यातीवर बंदी असली, तरीही परभणी विभागात कापसाचे उत्पादन मात्र विक्रमी झाले आहे. या हंगामात तब्बल २२ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. यात राज्य सरकारच्या कापूस पणन महासंघामार्फत झालेली खरेदी ५ लाख क्विंटलच्या आसपास आहे.
या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच कापसाचे भाव कमी आहेत. केंद्र सरकारच्या हमीभावानुसार ४ हजार ५० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे महाराष्ट्रात सीसीआयच्या धर्तीवर कापूस खरेदी करण्यात आला. परभणी विभागात या वर्षी १९ मार्चपर्यंत सीसीआमार्फत ११ लाख २३ हजार ६५६ क्विंटल, तर खासगी व्यापाऱ्यांनीही तब्बल ६ लाख १० हजार ६२८ क्विंटल कापसाची खरेदी परभणी विभागात केली. राज्य कापूस पणन महासंघाच्या वतीने ४ लाख ९८ हजार ३०१ क्विंटल कापसाची खरेदी झाली. १५ नोव्हेंबर ते १५ मार्च दरम्यान पणन महासंघाने ही खरेदी केली. गेल्या ५ वर्षांत पणन महासंघाने केलेली ही सर्वात मोठी खरेदी आहे. पणन महासंघाने अत्याधुनिक अशा ऑनलाईन ‘टीएमसी’ युनिटमध्ये ही सर्व खरेदी केल्याने एकाचवेळी खरेदीसोबत जिनिंग प्रेसिंग व गाठी स्टोअरेजचे कामही संपले आहे.
या वर्षी राज्य सरकारने ‘सीसीआय’सोबत करार करून सीसीआयचे एजंट म्हणून पणन महासंघाद्वारे सीसीआयप्रमाणेच खरेदी केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास खरेदीचे प्रतिनिधित्व मिळावे व एका कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच एजंट असावा या माध्यमातून जिल्ह्यात नऊ तालुक्यांपकी सेलू, मानवत, पाथरी व जिंतूर येथे सीसीआयने, तर गंगाखेड, सोनपेठ, पूर्णा, लिमला या ठिकाणी पणन महासंघाने खरेदी केली. परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण, तसेच येथे कापसाची मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी पणन महासंघ व सीसीआय या दोघांनीही कापसाची खरेदी केली.
परभणी विभागातील िहगोली जिल्ह्यातील वसमत व औंढा हे तालुके सीसीआयला, तर िहगोली, सेनगाव, कळमनुरी या तालुक्यांमध्ये पणन महासंघाच्या वतीने खरेदी करण्यात आली. िहगोली येथे फक्त एकच युनिट उपलब्ध झाल्याने या जिल्ह्यात कापसाची खरेदी कमी झाली. गेल्या ५ वर्षांपासून कापूस पणन महासंघाची खरेदी केंद्रे नावालाच होती. त्यातच बराचसा कर्मचारी वर्ग निवृत्त झाला असल्याने या वर्षी पणन महासंघाची खरेदी जास्त झाली. परिणामी कापसाचे चुकारे वेळेत मिळण्यात शेतकऱ्यांना विलंब झाला. खरेदी केलेल्या पूर्ण कापसाचे चुकारे देण्याचे काम सध्या सुरूआहे. शेतकऱ्यांनी आपल्या कापसाचे चुकारे संबंधित केंद्रावरून घेऊन जाण्याचे आवाहन कापूस पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेणके यांनी केले आहे.