शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेट्टी हे आत्मक्लेश यात्रा घेऊन राजभवनाकडे आणि मी शेतकऱ्यांच्या बांधाकडे जात असून या प्रश्नी शासन संवेदनशील असल्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरी सत्काराचे आयोजन इस्लामपूरच्या यल्लमा चौकात करण्यात आले होते. यासाठी श्री. खोत हे नियोजनात व्यस्त होते. यावेळी विश्रामधामवर त्यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संपर्क साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेट्टी यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली. त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी प्रार्थना आपण ईश्वराकडे करीत आहोत. मी अद्याप दोन दिवस गावीच थांबणार असून मला मुंबईला त्यांची विचारपूस करण्यासाठी जाणे जमेलच असे नाही. मात्र, तेवढय़ा कालवधीत त्यांना आराम मिळेल, अशी आशा मी करतो. खा. शेट्टी यांच्या मागण्या योग्य असून आपण सरकारमध्ये  राहून सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाने न मागणी करता उसाच्या एफआरपीमध्ये टनाला २६८ रूपयांनी वाढ केली. यापूर्वीच्या सरकारकडे मागणी करीत असताना आंदोलन हाती घ्यावे लागत होते. यासाठी लाठय़ा काठय़ा खाव्या लागल्या. उसाचा खरेदी कर माफ करीत असताना अंदाजपत्रकात ७०० कोटींची तरतूद शासनाने केली. उपसा सिंचन योजनेचा वीज दर कमी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन संवेदनशील आहे. शासन घेत असलेल्या निर्णयाबद्दल मी समाधानी आहे.

‘आत्मक्लेश’ यात्रेच्या मुहुर्तावर सदाभाऊंची ‘आत्मपरीक्षण’ खेळी

खा. शेट्टी हे संघटनेचे मोठे नेते असून आंदोलनाच्या माध्यमातून ते जागृती करीत आहेत. आम्हीही गेली ३० वर्षे हेच काम केले आहे. प्रश्न सोडविण्यासाठी चर्चेसाठी शासनाची दारे खुली आहेत. भाजपाने विश्वासघात केला असल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला आहे, याबाबत विचारले असता खोत म्हणाले की, युतीची साडेचार वर्षे आणि सध्याच्या शासनाची अडीच वर्षे काळ सोडला तर, बहुंताशी काळ काँग्रेसकडेच सत्ता होती. त्यांना या प्रश्नांची सोडवणूक का करता आली नाही? मुख्यमंत्री फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे आहेत. जलयुक्त शिवार योजनेद्बारे जलसाठे वाढले. मात्र आघाडी शासनाच्या काळात केवळ धरणाचे कामे ही बगलबच्च्यांना पोसण्यासाठीच करण्यात आली. कोटय़ावधी रूपयांचा निधी हा धरणाची कामे करण्यापुर्वी कालव्यावर खर्च केला गेला. यामुळे हा पैसा मातीत गेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेल्या मतभेदाबाबत थेट विचारले असता खोत म्हणाले की, मी सरळ चालणारा कार्यकर्ता आहे. मागे वळून न पाहता चालत राहणार असून ना मला भविष्याची चिंता, ना वादळाची चिंता असल्याचे त्यांनी म्हटले.

स्वाभिमानीसाठी सदाभाऊ खोत हा विषय संपला-राजू शेट्टी