पाकिस्तानवर हल्ला केलाच पाहिजे अशी परिस्थिती असून, भारतीय तरूण पिढीची तशी भावनाही आहे, तरी हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तरूणांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे भूकंप, पुनर्वसन मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे, हा जनतेचा निरोप आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त रिओ ऑलिम्पिकपटू ललिता बाबर हिच्या विशेष सन्मान सोहळय़ात ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, नामदार शेखर चरेगावकर, श्वेता शालिनी, डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठनेते राजाभाऊ देशपांडे, भरत पाटील, नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, मनोज घोरपडे, रवी अनासपुरे, विनायक पावसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पाटील-निलंगेकर म्हणाले, की सरकार अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करणार आहे. या स्मारकासाठी शहीद जवानांच्या गावची माती एकत्रित करून वापरावी. सातारा जिल्ह्यातील शहिदांच्या गावची माहिती गोळा करण्यासाठी विक्रम पावसकर यांनी पुढाकार घ्यावा. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. याला उत्तर देण्याचे काम भारतीय लष्कर करणार आहे.

हुतात्मा चंद्रकांत गलंडे यांच्या कुटुंबीयांची आपण भेट घेतली. त्या वेळी त्यांच्या वीरपत्नीने दोन्ही मुलांना सैनिक करणार असून, पाकिस्तानला धडा शिकवण्याची इच्छा व्यक्त केली. तमाम जनतेचीही हीच भूमिका असून, तशा आशयाचे संदेश तरूणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत पोहोचवावेत. आपणही सातारा भूमीचा हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहोत. विक्रम पावसकरांचा विविध उपक्रमांनी साजरा झालेला वाढदिवस खऱ्या अर्थाने आदर्शवत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

ललिता बाबर म्हणाल्या की, भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक आणण्याचा आपला निर्धार कायम आहे. २०२० मधील ऑलिम्पिकमध्ये पदक नक्की मिळवेन, रिओ ऑलिम्पिकमध्ये मला आणि देशाला पदकाची आशा होती. मात्र ते न मिळाल्याची खंत आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवले. जिल्ह्यात खूप टॅलेंट असून, मुलींना प्रोत्साहन दिल्यास आणखी ललिता निर्माण होतील असा विश्वास देताना, कराडकरांकडून झालेला सत्कार घरचा असल्याचे भावोद्गार त्यांनी या वेळी काढले. शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, विनायक पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले.