अंबादेवी संस्थानकडे जमिनीसंबंधी नोंदवही संग्रहित करण्यात न आल्याने जमिनीची अद्ययावत माहितीच उपलब्ध नाही. संस्थानची बरीच जमीन विश्वस्तांनी विकली आहे. काही जमीन धरणांमध्ये किंवा शासकीय प्रकल्पांमध्ये गेली आहे. काही जागांच्या बाबतीत कुळाचे वाद असल्याने प्रकरणे न्यायालयात आहेत. न्यायालयीन प्रकरणांमध्ये पाठपुरावा करण्यात व्यवस्थापक मंडळ कमी पडत असून वेळेत कार्यवाही करून मालमत्ता ताब्यात घेण्यात विश्वस्त मंडळाची उदासीनता दिसून येत असल्याचा निष्कर्ष धर्मदाय सहआयुक्त कार्यालयाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे.

न्यासाने दिलेल्या जमिनीच्या यादीनुसार प्रत्यक्ष माहिती जुळून येत नाही, त्यामुळे संस्थानने मालमत्तेची नोंदवही संग्रहित करून त्यात शेतजमिनीच्या सात-बारासह अद्यावत नोंदी घेण्यात याव्यात. प्रकल्पात गेलेल्या जमिनी, मोबदला, न्यायालयातील वाद, ताब्यात असलेल्या जमिनी, त्यापासून मिळणारे उत्पन्न याविषयी संपूर्ण माहिती तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. मालमत्तेचा दस्तावेज न ठेवणे, उत्पन्नाचा तपशील न ठेवणे, जमिनीचा लिलाव न घेणे, पडिक जमिनीबाबत वेळेत निर्णय न घेणे हे प्रकार घडले आहेत.

संस्थानच्या शहरालगत असलेल्या जमिनी बऱ्याच वर्षांपासून पडिक आहेत. त्यांचे मूल्य सध्या कोटय़वधी रुपयांमध्ये आहे. ज्यांच्या वापरामुळे संस्थानला बराच फायदा झाला असता. मंदिराच्या इमारतींमध्ये बऱ्याच काळापासून आधुनिकीकरण केल्याचे दिसून येत नाही. मंदिराचा काही भाग जीर्ण अवस्थेत असून तो केव्हाही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भक्तांकडून मंदिराच्या बांधकामाकरिता, सुशोभीकरणासाठी दानात जमा झालेला पैसा इतर बांधकामासाठी वापरण्यात आला. मंदिराला मिळणाऱ्या देणगी, दानातून मंदिराचाच विकास होत नसल्याने मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी भक्तांमध्ये रोष असल्याचे जाणवते, अशा ऐतिहासिक देवस्थानची विकासाची गती अतिशय मंद असल्याचे निरीक्षणही नोदवण्यात आले आहे. न्यासाच्या स्थावर मालमत्तेची नोंदवही संग्रहित करून त्यामध्ये जमिनीच्या अद्ययावत नोंदी घेण्यात याव्यात, प्रत्येक जागेचे, इमारतीचे, घराचे अद्यावत ८-अ, मनपा असेसमेंट, नझुल नक्कल सोबत तपासणीस उपलब्ध करून देण्यात यावी, न्यासाच्या कोणत्या जागा शासकीय प्रकल्पात अथवा योजनेत गेल्या, त्याचे विवरण, जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या रकमेची माहिती तसेच जागा संपादित केल्याचे आदेश, जागेचा मोबदला न्यासाच्या खात्यात जमा केल्याच्या नोंदीसह दस्तावेज तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, ज्या न्यासाच्या जागेचा, इमारतीचा, घराचा वाद न्यायालयात आहे, त्याची अद्ययावत माहिती तसेच न्यायालयाचे प्रकरण आतापर्यंत न्यायालयाकडून जागेसंबधी झालेले आदेश, प्रकरणांची अद्ययावत स्थिती, मालमत्ता कोणाच्या ताब्यात आहे, याबाबत धर्मदाय सहआयुक्त कार्यालयाला माहिती सादर करावी, असे सांगण्यात आले आहे.

न्यासाच्या जागेवर, इमारतींवर, खुल्या भूखंडांवर बोजा अथवा गहाण दिली असल्यास किंवा स्थावर मालमत्तेवर कर्ज असल्यास त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र संस्थानतर्फे सादर करण्यात यावे. न्यासाच्या ताब्यात असलेल्या जागा, इमारत, घरांचे विवरण व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण तसेच भाडय़ाने दिलेली दुकाने, घर व इमारतीबाबत करारांची माहिती सादर करावी, असेही सांगण्यात आले आहे. मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये जे वाद सामंजस्याने, एकत्रित येऊन सोडवायला पाहिजे होते, पण ते वेळेत सोडवले नाहीत. संस्थांनच्या जमिनीवर, इमारतींवर कब्जा केलेल्या व्यक्तींशी वाटाघाटी करून अथवा वेळेत कार्यवाही करून मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत विश्वस्त मंडळाची उदासीनता दिसून येते, असा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आला आहे.    (क्रमश:)