इंद्रायणी तांदळाच्या नावाखाली कमी प्रतीच्या तांदळात सुगंधित पावडर भेसळ करून विक्री करण्यात येत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शनिवारी तालुक्यातील घोटीसह देवळे येथील तांदुळ गिरण्यांवर छापे टाकले. पथकाने काही नमुने ताब्यात घेलले असून, प्रयोगशाळेतील तपासणीनंतर संबंधित गिरण्यांवर कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी दिली. 

घोटी ही तादळाची बाजारपेठ म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिध्द आहे. घोटीतील तांदुळ गिरण्यांमधून ग्राहकांच्या डोळ्यांत धूळफेक करत बनावट सुगंधी तांदळाची विक्री होत असल्याच्या तक्रारी याआधीही अनेकवेळा झाल्या आहेत. बासमती समकक्ष समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या नावाखाली हलक्या प्रतीच्या तांदळात सुगंधित पावडर टाकून इंद्रायणी म्हणून कित्येक महिन्यांपासून राज्यातील बाजारपेठांमध्ये हे बनावट तांदुळ पाठविण्यात येत होते.
हा प्रकार उघड झाल्यानंतर मागील वर्षी अन्न व औषध प्रशासनाने येथील तांदुळ गिरण्यांवर छापे टाकले होते. या कारवाईचा धसका घेतल्याने भेसळीच्या प्रमाणात घट झाली होती. परंतु काही दिवसांपासून भेसळीचा प्रकार पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शनिवारी दुपारपासून गिरण्यांवर छापे टाकण्यास सुरूवात केली. देवळे येथील राजेंद्र नागरे यांच्या नागरे इंडस्ट्रिज आणि सचिन सुराणा यांच्या जय आनंद इंडस्ट्रिज या दोन गिरण्यांवर छापे टाकण्यात आले.
पथकाला संशयास्पद तांदुळ मिळून आल्याने तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी तात घेण्यात आले.
दरम्यान, या कारवाईचा धसका घेत घोटीतील उत्पादकांनी आपल्या गिरण्या बंद करून तांदळात भेसळ करण्यात येणाऱ्या पावडरीचे डबे इतरत्र हलविले. ताब्यात घेतलेले नमुने प्रयोगशाळेतील तपासणीत भेसळीचे आढळून आल्यास संबंधित गिरणी मालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सहआयुक्त चंद्रकांत पवार
यांनी सांगितले.