मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उद्देशाने अलिबागजवळील फाऊंटन हेड लीडरशिप सेंटरजवळ विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.  इडेलगिव्ह फाऊंडेशनच्या आगस्त इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेनी या केंद्राची स्थापना केली असून, अलिबाग परिसरातील ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी या विज्ञान केंद्राचा लाभ घेऊ शकणार आहे. शहरी भागातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात, मात्र ग्रामीण भागातील मुलांना असे उपक्रम उपलब्ध होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन  इडेलव्हीव फाऊंडेशननी विज्ञान केंद्राचा उपक्रम सुरू केला आहे.
केंद्र आणि संवाद या दोन विभागांत हे विज्ञान केंद्र काम करणार आहे. विज्ञान केंद्रात मुलांना आणि शिक्षकांना वैज्ञानिक प्रयोग अनुभवता येतील, तर मोबाइल व्हॅन्सच्या मदतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल. विज्ञान केंद्रात गणित, विज्ञान, पर्यावरण आणि सौरऊर्जा असे विभाग असून आकलन व शोध या दोन्ही घटकांना वाव असणार आहे असल्याचे इडलगिव्ह  फाऊंडेशनच्या विद्या शहा यांनी सांगितले. या विज्ञान केंद्राचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील ५० शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.
 ग्रामीण भागातील मुले स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कमी पडतात, विज्ञान केंद्राच्या उपक्रमाचा त्यांना फायदा होऊ शकेल. जास्तीत जास्त मुलांनी या केंद्रास भेट देणे गरजेचे आहे, असे मत सुनील पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.