५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी बँकेसमोरील रांगेत उभ्या असलेल्या ७३ वर्षांच्या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बँकेतील कर्मचाऱ्यांच्या तणावात देखील वाढत असल्याचे दिसत आहे. सोलापूरमधील मंगळवेढा स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी घनशाम भास्कर कुलकर्णी यांना बँकेतील वाढलेल्या कामकाजाच्या तणावामुळे रक्तदाब आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बँकमध्ये वरिष्ठ कारकून पदावर कार्यरत असणाऱ्या ५७ वर्षीय कुलकर्णी यांना संध्याकाळी ६ च्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. त्यांना वाढलेल्या कामकाजामुळे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे १०८ क्रमांकावर संपर्क साधून बँकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर त्यांना सोलापूरला हलविण्यात आले आहे.

[jwplayer LzqibyJK]

आपल्याजवळील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी ठिकठिकाणी विविध बँकांच्या शाखांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मंगळवेढातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील शनिवारी सकाळपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण वाढला आहे.  नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी बँकाच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यात आले आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. सोलापूरमधील या घटनेमुळे नागरिकांप्रमाणेच कर्मचाऱ्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

[jwplayer QU3vdqFF]