आश्रमातील अंध, मूकबधिर मुलांना प्रवेश नाकारल्याची खंत
अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी पुरस्कार स्वीकारण्यास विनम्रपणे नकार देत आश्रमातील अंध, मूकबधिर मुलांविषयीची आस्था पुन्हा एकदा स्पष्टपणे व्यक्त केली. गेल्या २४ एप्रिलला मुंबई येथे त्यांना हा पुरस्कार दिला जाणार होता, पण पुरस्कार समारंभात पाच अनाथ मुलांना आणण्याची त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी समारंभाला न जाणेच पसंत केले.
शंकरबाबा पापळकर यांनी यापूर्वीही हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता, पण त्यावेळी कारण वेगळे होते. जोपर्यंत दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी स्वत: आश्रमात येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार नाही, तोपर्यंत आपण हा पुरस्कार स्वीकारणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. अखेर गेल्या ८ जानेवारीला दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने भारती हृदयनाथ मंगेशकर, विद्या राम शेवाळकर, अचलपूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद तारे हे वझ्झर येथील आश्रमात पोहचले होते. त्यावेळी त्यांनी शंकरबाबांना पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली होती.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७४ व्या स्मृतिदिनानिमित्त शंकरबाबा पापळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. सामाजिक कार्यासाठीचा आनंदमयी पुरस्कार शंकरबाबा पापळकर यांना बहाल करण्यात येणार होता. हा पुरस्कार स्वीकारणार अशी भूमिका शंकरबाबांनी घेतल्याने ते मुंबईत पोहचून हा पुरस्कार स्वीकारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण ते पुरस्कार समारंभाला पोहचलेच नाहीत. ते रविवारी वझ्झर येथील आश्रमातच आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. आपला पुरस्काराला विरोध नाही. पण आश्रमातील मूकबधिर मुलांना सन्मानाने समारंभाला बोलावणे आल्यासच आपण हा पुरस्कार स्वीकारू, असे शंकरबाबा पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.

‘रीतसर निमंत्रणच मिळाले नाही’
पुरस्कार समारंभाला न जाण्याचे कारण विचारले असता शंकरबाबा पापळकर म्हणाले, आपल्याला या समारंभाचे रीतसर निमंत्रणच मुळात मिळाले नाही. ज्यावेळी भारती मंगेशकर आश्रमात आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी आश्रमातील अनाथ, अपंग मुलांनाही पुरस्कार समारंभाच्या पासेस दिल्या जातील, असे सांगितले होते, पण त्यांची व्यवस्था सोडाच, आपल्यापर्यंतही कुणी पोहचले नाही. २३ एप्रिलला सकाळी स्वत: आशा भोसले यांचा फोन आला. आपण समारंभाला येणार आहात का, अशी विचारणा त्यांनी केली. आपण विमानाने मुंबईत पोहचा, असे त्यांनी सांगितले, पण आश्रमातील मुलांची व्यवस्था होणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे कळवले. आपल्याला कुठे जायचे आहे, कोण सोबत राहणार आहे, याविषयी काहीच कल्पना नव्हती. आपल्यासोबत किमान पाच मुलांना व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोलवा, अशी माझी अपेक्षा होती, पण ती पूर्ण न झाल्याने आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो नाही.