जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ‘होम पिच’वर धक्कादायक निकाल लागल्यावर काहीसे ‘बॅकफुट’वर गेलेले ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हणत सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पाठवला आहे. पक्षप्रमुख हा राजीनामा स्वीकारण्याची शक्यता नसली तरी विरोधकांची तोंडे बंद करण्याचा भुसे यांचा प्रयत्न असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

गेली पंधरा वर्षे दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मालेगाव तालुका पंचायत समितीत सत्ता आहे. आताच्या निकालात मात्र शिवसेना तसेच प्रतिस्पर्धी भाजपला चौदापैकी प्रत्येकी सहा जागा मिळाल्याने सत्ता टिकविण्याचे गणित सेनेला फारच अवघड झाले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी केवळ दोन ठिकाणी सेनेला यश मिळवणे शक्य झाले आहे. यापूर्वी गटात चार जागा मिळविणा-या सेनेची दोन जागांपर्यंत झालेली घसरगुंडी आणि भाजपने पाच जागांपर्यंत मारलेली मजल हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेने क्रमांक एकचा पक्ष म्हणून चांगले यश मिळवले असले, तरी स्वत:च्या तालुक्यात मात्र भुसे यांना अनपेक्षित हार पत्करावी लागली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रावळगाव तसेच सौंदाणे गटातील दारूण पराभव सेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे सध्याचे चित्र आहे.

निकालानंतर आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना भुसे यांनी जनतेचा कौल मान्य असल्याचे स्पष्ट केले. मात्र पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षप्रमुखांकडे मंत्रीपदाचा राजीनामा पाठवून दिला असल्याचेही नमूद केले. तसेच पराभव झाला तरी पूर्वीप्रमाणेच जनतेची कामे करत राहू, असेही भुसे यांनी म्हटले आहे.