ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील उर्से टोलनाक्यावरील आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना फैलावर घेतले. मुंबई-पुणे एक्सप्रेस आणखी कितीजणांचे जीव घेणार ?, असा संतप्त सवाल सिंधुताई यांनी टोलनाक्यावरील आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना विचारला.

बुधवारी रात्री मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्यासमोर एका वाहनाचा अपघात होणार होता. मात्र हा अपघात थोडक्यात टळला. या गाडीमध्ये जवळपास वीस महिला आणि लहान मुले होती. ही घटना पाहून सिंधुताई सपकाळ संतापल्या. यानंतर गाडीतून उतरुन सिंधुताईंनी त्यांचा संताप आणि उद्विग्नता व्यक्त केली. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना सिंधुताईंनी खडे बोल सुनावले.

‘एक्सप्रेस वेचा वापर करणारे टोल भरतात. तुम्ही आणखी किती लोकांचे जीव घेणार आहात ?,’ असा संतप्त सवाल सिंधुताईंनी उर्से टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना विचारला. येत्या ८ दिवसांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यास हजारो नागरिकांसह महामार्गावर उतरुन आंदोलन छेडण्याचा इशारादेखील सिंधुताई यांनी दिला.

‘खोपोली ते लोणावळा मार्गावर सगळ्या मोठ्या गाड्यांनी वाहतूक अडवली आहे. सर्व लेनमधून अवजड वाहने जात आहेत. त्यामुळे लहान गाड्या पुढे सरकू शकत नाहीत. ज्या गाड्या मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा कधीही अपघात होऊ शकतो. आता माझ्यासमोर एका वाहनाचा अपघात होता होता राहिला. खोपोली ते लोणावळा मार्गावर तुमच्या गाड्या का नसतात ? तुम्हाला माणसं मारण्याचा अधिकार कोणी दिला ?’ अशा शब्दांमध्ये सिंधुताई सपकाळ यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.