रायगड जिल्ह्य़ात सामाजिक बहिष्कार प्रकरणांबाबत जनजागृती सुरू असली तरी वाळीत प्रकरणांत दिवसांगणिक भरच पडत आहे. करंजखोल गावी सहा कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले आहे, म्हसळा तालुक्यातील कोळे गावी तर सरपंचांनाच गावकीने बहिष्कृत केले आहे, न्यायालयाच्या आदेशाच्या जोरावर खाजगी जागेतला रस्ता देत नसल्याचा राग धरून याच तालुक्यातील मेंदडी कोंड गावातील जनार्दन बुधे यांना वाळीत टाकण्यात आले आहे तर एव्हरेस्टवीर राहुल येलंगे यांच्यावरील बहिष्काराचे चटके त्यांच्या गोठय़ातील गायीगुरांनाही बसले असून वाळीतकांडात भूतदयाही खाक झाली आहे.
महाड शहराजवळ  मुंबई- गोवा महामार्गावरील करंजखोल या गावी २००९मधील मारामारी प्रकरणावरून रमेश मोरे यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले असतानाच त्यांच्याशी संबंध ठेवल्यावरून दत्ताळीतील आणखी पाच कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले आहे.  मोरे यांचे मोठे भाऊ बाळकृष्ण मोरे, तुकाराम शिगवण, गणपत सावंत यांच्या कुटुंबांचा यात समावेश आहे. रायगडमधील वाळीत प्रकरणांना वाचा फुटल्यावर या कुटुंबांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण ही प्रकरणे गावातच सामोपचाराने मिटवा, असे सांगत पोलीस तक्रार घेत नसल्याने न्यायासाठी जायचे कुठे, असा प्रश्न या सहा कुटुंबांना भेडसावत आहे.
विशेष म्हणजे राज्य सरकारच्या तंटामुक्त गाव योजनेंतर्गत करंजखोल गावाला २००७मध्ये पुरस्कार प्राप्त झाला आहे!
बहिष्काराची वाट
 रहदारीसाठी खासगी जागेतून रस्ता नाकारल्याने म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड गाव पंचायतीने जनार्दन बुधे यांच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रहदारीसंदर्भात म्हसळा न्यायालयाने बुधे यांच्याच बाजूने निकाल देऊनही त्याची तमा न बाळगता गाव पंचायतीने न्यायालयाचा अवमान करण्याचे धाडस दाखवले आहे. या अन्यायाविरोधात बुधे यांनी मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे.
न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल देऊनही वेळोवेळी रहदारीसाठी रस्ता मोकळा करण्याबाबत आपल्यावर दबाव आणण्यात आला. आपल्या वडिलांचे निधन झाले तेव्हाही त्यांच्या अंत्ययात्रेत हा प्रश्न काढून असहकार्याच्या धमक्या दिल्या गेल्या. २०१०पासून वेळोवेळी अन्याय करणाऱ्या जुलमी गाव पंचायतीमुळे आपल्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून, हा अन्याय दूर करावा, अशी मागणी बुधे यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.

गावकीचा निवडणूक आयोग!
निवडून आलेला सरपंचही वाळीत
गावकीने निवडणूक लढवू नको, असे सांगितले असतानाही निवडणूक लढवून सरपंचपदी निवडून आल्याने गावकीने म्हसळा तालुक्यातील कोळे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल पेंढारी यांनाच त्यांच्या कुटुंबासह बहिष्कृत केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी तब्बल ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३२ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे. २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका पेंढारी यांनी लढवल्या आणि ते सरपंचही झाले. याचा राग मनात ठेवून गावकीने त्यांना गावातील सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई केली. अन्य कुटुंबांशी संबंध ठेवण्यासही बंधने घालण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावकीने आकारलेला १० हजार दंड आणि ९ हजार ५२० अशी वर्गणी भरूनही आपल्यावर टाकलेला बहिष्कार गावकीने मागे घेतला नसल्याचा दावा पेंढारी यांनी केला. अखेर या प्रकरणी १७ जानेवारीला पेंढारी यांनी म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. यात मुंबई मंडळातील २२ पुरुष आणि ३ महिलांचा, तर गावातील १० पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.

गोमातांनाही चटके..
बहिष्कृत एव्हरेस्टवीर राहुल येलंगे याच्या घराजवळील गुरांचा गोठा बुधवारी पहाटे जळून भस्मसात झाला. यात दोन गायी पण भाजल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच हा गोठा होळीच्या माळाजवळ असल्याने काढून टाकण्यात यावा अशी नोटीस भोगाव ग्रामपंचायतीने राहुल याला दिली होती. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, या प्रकरणी २८ अज्ञात व्यक्तिंविरोधात इजा पोचवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळीत प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही.