हिंदवी स्वराज्य आणि सुराज्याचा कारभार ज्या रायगडावरून चालायचा त्याच रायगड जिल्ह्य़ाला सध्या सामाजिक बहिष्काराच्या ग्रहणाने ग्रासले आहे. क्षुल्लक वाटणाऱ्या कारणावरून संपूर्ण गाव वा समाजाने एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकण्याच्या घटना जिल्ह्य़ात वारंवार उघडकीस येत आहेत. त्यात पोलिसांच्या ढिम्मपणामुळे बहिष्कार टाकणाऱ्या मस्तवालांनाही चेव चढत आहे. जिल्ह्य़ातील वरसोली व कोंझरी येथील बहिष्काराचे प्रकरण ताजे असतानाच महाड तालुक्यातील वाकी गावातही जमिनीच्या वादातून शशिकांत येरुणकर यांच्या कुटुंबाला गावकीने सहा वर्षांपासून वाळीत टाकले आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात येरुणकर यांनी नऊ महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीही केले नाही.
येरुणकर कुटुंबाच्या आजोबांच्या नावावर असलेली जमीन त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला बक्षीसपत्र म्हणून दिली होती. या जागेवरील शाळा मोडकळीस आल्याने जिल्हा परिषदेने नवीन शाळेच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला होता. आधीची जागा अपुरी पडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर येरुणकर कुटुंबाने शाळेसाठी आणखी पाच गुंठे जागा देण्याची तयारी दाखवली, परंतु येरुणकर यांच्या आजोबांनी शाळेच्या नावावर बक्षीसपत्र केलेली जागा आणि नव्याने देणार असलेली जागा गावकीच्या नावावर बक्षीसपत्र करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली. त्यावर सदर जागा आधीच शासनाच्या नावाने बक्षीसपत्र करण्यात आल्याने ती गावकीच्या नावावर करणे शक्य नसल्याचे येरुणकर यांनी सांगितले. यावरून गावकी आणि येरुणकर कुटुंबात वाद झाला. त्याची परिणती येरुणकर कुटुंबाला वाळीत टाकण्यात झाली. तर शाळेची इमारत येरुणकर यांच्या जागेतून स्थलांतरित करण्यात आली. याबाबत येरुणकर यांच्या कुटुंबाने फेब्रुवारी महिन्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तब्बल ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नऊ महिने उलटले तरी पोलिसांनी अद्याप दोषारोपपत्र दाखल केलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात काही त्रुटी आढळल्याने दोषारोप पत्र दाखल झाले नसल्याचे महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांनी सांगितले.
*सहा वर्षांपासून येरुणकर कुटुंबाशी गावातले कोणीही बोलत नाहीत.
*गावातील दुकानातून खरेदी करणे, चक्कीवरून धान्य दळून घेण्यासही मनाई.
*सहा आसनी रिक्षेतही मज्जाव; शाळेची दारेही बंदच.
mh01
*जमिनीच्या वादातून शशिकांत येरुणकर कुटुंबाला वाकी ग्राम पंचायतीने सहा वर्षांपासून बहिष्कृत केले आहे. (छाया – जीतू शिगवण)