शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांनाही दर्शनासाठी प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन छेडणाऱ्या भूमाता ब्रिगेडमध्येच फूट पडल्याचे चित्र आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्याशी वाद झाल्यामुळे संघटनेतील तीन वरिष्ठ सदस्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संघटनेच्या आंदोलनाची धार कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भूमाता ब्रिगेडच्या उपाध्यक्षा पुष्पक केवाडकर यांनीही संघटनेत फूट पडल्याला दुजोरा दिला.
केवाडकर म्हणाल्या, तृप्ती देसाई यांच्याशी मतभेद झाल्यामुळे माझ्यासह तिघींनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महिलांच्या मुद्द्यावर लढा उभारण्यासाठी येत्या काही दिवसांतच आम्ही नवी संघटना काढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या संघटनेचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण लवकरच त्याची नोंदणी करू, असेही त्यांनी सांगितले. भूमाता ब्रिगेडमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून तृप्ती देसाई स्वतःच केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करीत होत्या, असाही आरोप त्यांनी केला.
संघटनेतून बाहेर पडलेल्या प्रियांका जगताप म्हणाल्या, मी सध्या राज्य सेवा परीक्षावर लक्ष केंद्रित केल्यामुळे संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर माझे संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांसमवेत काही मुद्द्यांवर मतभेद होते. त्यामुळेही मी हा निर्णय घेतला. कोणत्या मुद्द्यांवर मतभेद होते, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
फूट पडलेली नाही – तृप्ती देसाई
दरम्यान, तृप्ती देसाई यांनी भूमाता ब्रिगेडमध्ये फूट पडल्याचा वृत्ताचा इन्कार केला. जे काही वादाचे मुद्दे आहेत, त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. पण संघटनेत फूट पडलेली नसून, सर्व सदस्या आपल्यासोबत आहेत, असाही दावा त्यांनी केला. आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.