सीमाभागातील येळ्ळुर गावातील मराठी भाषकांनी मराठी बाण्याचे दर्शन घडवत शनिवारी अवघ्या २४ तासांत पुन्हा ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळुर’ नावाचा फलक उभा केला. मराठी भाषकांनी एकजुटीची परंपरा जोपासताना आज बंदोबस्तासाठी असलेल्या ७ पोलीस गाडय़ा हाकलून लावल्या. वर्षभरात मराठी भाषकांनी फलक उभारणीची कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. तर या घटनेपासून प्रेरणा घेत बेळगुंदी, सुळगा आदी गावातही ‘महाराष्ट्र राज्य’ असा उल्लेख असलेले फलक उभारण्यात आले असून त्याचे लोण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान सायंकाळी बेळगाव येथील वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात २५ हून अधिक पोलीस गाडय़ा फलक हटवण्याच्या तयारीनिशी उभ्या असल्याने बेळगाव व येळ्ळुर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले झाले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी कर्नाटक प्रशासनाने येळ्ळुर या गावात सिमेंट काँक्रीटच्या चौथऱ्यावर उभारण्यात आलेला ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळुर’ या नावाचा फलक हटवला होता. पोलीस व प्रशासनाच्या ताकदीमुळे तेथील मराठी भाषकांनी सावध भूमिका घेतली होती. मात्र मराठी भाषकांच्या मनातील असंतोष खदखदत होता. फलक काढल्याचे दुख प्रत्येक मराठी माणसाला वेदना देत होते. शिवाय, अचानक कर्नाटक प्रशासनाने ही कारवाई काल सुरू केली, तेव्हा येळ्ळुर गावातील बहुतांशी मराठी भाषक दैनंदिन काम, व्यापार, शेतकाम या करिता घराबाहेर पडला होता. रात्री गावकरी एकत्र जमल्यावर अन्यायाचा वचपा काढण्याची मानसिकता मराठी माणसाच्या मनात घर करून राहिली. त्याचा प्रत्यय शनिवारी दिवसभर दिसून आला.
शनिवारी दिवस उजडल्यापासून येळ्ळुर मधील नागरिकांनी उखडलेला फलक पुन्हा उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या. शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वानीच या मोहिमेत भाग घेण्याचे निश्चित केले. तरुणांच्यातील आवेश तर मराठी बाण्याचे दर्शन घडवत होता. गावातील ८ ते १० हजार मराठी भाषकांचा जमाव फलकाच्या ठिकाणी जमला. तेव्हा तेथे बंदोबस्तासाठी पोलिसांच्या सात गाडय़ा उभ्या होत्या. पोलीसही हत्यारानिशी बंदोबस्तासाठी तनात करण्यात आले होते. त्याची फिकीर न करताच मराठी भाषकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करीत त्यावर दगडफेक केली. मराठी बांधवांनी दिलेल्या प्रतिउत्तरामुळे पोलिसांची पुरती भंबेरी उडाली होती. परिस्थितीचे भान ओळखून पोलिसांनी वाहनांसह बेळगावकडे कुच केली तर त्यांच्यामागे जमाव दगडफेक करीत धावतच होता. येळ्ळुरपासून ते वडगावपर्यंत पोलिसांना पिटाळून देण्यात यश आले. गावाकडे परत येताना जमावाने रस्त्यावर अडथळे उभे केले. ज्यामुळे पोलिसांना पुन्हा गावात परतणे अशक्य झाले होते.
दरम्यान येळ्ळुरमध्ये काल जिथे फलक काढून टाकण्यात आला होता, तेथे शेकडो मराठी भाषक एकत्रित जमले. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत अल्पावधीतच पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळुर’ असा सुमारे सहा फूट उंचीचा फलक बसवण्यात आला. त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेजारीच मराठी अस्मितेचे प्रतीक असलेला भगवा ध्वजही लावण्यात आला. या फलकास मराठी भाषकांनी अभिवादन केले. हा प्रकार दुपापर्यंत सुरू होता. गतवर्षी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी गुपचूप येऊन हा फलक पाडला होता. पण दुसऱ्याच दिवशी मराठी भाषकांनी पुन्हा फलक उभा करून मराठी ऐक्याची प्रचिती घडवली होती. काल कर्नाटक प्रशासनाने फलक काढल्यानंतर कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे राज्य अध्यक्ष नारायन गौडा पुन्हा फलक उभारल्यास बेळगावमध्ये घुसून तो काढून टाकू अशी वल्गना केली होती. त्याचा समाचार घेताना आज येळ्ळुर ग्रामस्थांनी गौडा यास पोलीस बंदोबस्तात न घेता गावात यावे, असे प्रति आव्हान दिले आहे.
दरम्यान मराठी भाषकांच्या ताकदीचे दर्शन घडल्याने कर्नाटक शासन गडबडून गेले आहे. सायंकाळी बेळगावजवळील वडगाव पोलीस ठाण्यामध्ये २५ पोलीस गाडय़ा उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सशस्त्र पोलीस तनात केले होते. त्यांच्याकडून येळ्ळुर गावात जाऊन कारवाई करण्याची हालचाल सुरू होती. हे वृत्त समजल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील व कार्यकत्रेही संघटित होऊ लागले होते. पुन्हा एकदा सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.