स्पर्धेच्या युगात नुसत्या शाळा स्मार्ट होऊन चालणार नाही, तर त्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी स्मार्ट होणे गरजेचे आहे, असे मत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी शनिवारी येथे शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारंभाप्रसंगी व्यक्त केले. स्कूलचे संमेलन संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समितीचे सभापती प्रमोद सावंत, जिल्हा परिषद सभापती आत्माराम पालयेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, दिनेश नागवेकर, कुंदा पै, धीरेंद्र होळीकर, सोनू सावंत, व्ही. बी. नाईक आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. जिल्ह्य़ातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत टिकत नाहीत, अशी आजपर्यंत ओळख होती. मात्र इंग्लिश शिक्षण देणाऱ्या जिल्ह्य़ातील शांतिनिकेतनसारख्या शाळेच्या माध्यमातून ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्य़ात शिक्षणाने समृद्धी निश्चितच येणार आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘शांतिनिकेतनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर विविध क्षेत्रांत टिकण्यासाठी व्यवहार ज्ञान देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शांतिनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना भविष्यात कोणतेही स्पर्धात्मक आव्हाने पेलण्यास मदत होणार आहे.’ परब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इंग्रजी येणे आवश्यक आहे. या प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि मुलांना शैक्षणिकदृष्टय़ा बळकट करण्यासाठी पालकांनी सकारात्मक दृष्टीने वागावे, असे सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या लहान मुलांचा उपस्थितांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.