सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कणकवली, सावंतवाडी, कुडाळ शहरात चोरांनी घातलेला धुमाकूळ पोलिसांची डोकेदुखी बनला आहे. जनतेची झोप उडविणाऱ्या चोरांना रात्रीच्या वेळी गस्त घालूनही पोलीस पकडू शकले नाहीत, त्यामुळे जिल्ह्य़ातील जनता प्रचंड नाराज आहे. कणकवली शहरात चोऱ्यांचा सिलसिला सुरू झाला तेव्हा उच्चभ्रू घराण्यातील तरुणांना पोलीस साहाय्यक निरीक्षक प्रशांत लांगी यांनी पकडले. त्यानंतर कणकवलीतून त्यांच्या विरोधात आघाडी उघडली गेली. जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी त्यांची बदली केली, पण कणकवलीचा फ्लॅट, घरे फोडणाऱ्या चोरांची गँग कार्यरत राहिली आहे. घरात किंवा फ्लॅटमध्ये कोणी नाही याची टेहळणी करून चोऱ्या करण्यात येत असल्याचे उघड झाले.
कणकवली चोऱ्यांचा सिलसिला सुरूच असताना सावंतवाडी शहरातही चोरांनी चोरीची मालिका सुरूच ठेवली. लग्नाला आलेला अहेरही चोरांनी पळविला. रात्रीच्या वेळी किमान चार-पाच बंगले फोडले जात आहेत. या चोऱ्यांमुळे जनतेसोबतच पोलिसांचीही झोप उडाली आहे. कणकवली, सावंतवाडीपाठोपाठ कुडाळ शहरातही चोरांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. परप्रांतीय कामगार, स्थानिकांचाही चोऱ्यांत सहभाग असावा, असा संशय आहे. सराईतापेक्षा बेकार तरुणांच्या टोळक्यांनी चोऱ्या करण्यास पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्य़ात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा धाक राहिला नाही. त्यामुळे चोरटे बेफाम बनले आहेत. सिंधुदुर्गातील काही भाग गोवा राज्य, बेळगाव, कोल्हापूर सीमेवर आहेत, त्यामुळे परप्रांतात जाण्यास जलद मार्ग त्यांना आहेत. सिंधुदुर्गात बंद फ्लॅट, घरे फोडणारे टोळके दिवसा टेहळणी करीत असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्य़ात अपार्टमेंट संस्कृती निर्माण झाल्याने शेजारधर्म आता बंद खोल्यांतील झाला आहे. त्यामुळे शेजारी-पाजारी कोण येतो, जातो याचे कोणालाही सोयरसुतक राहिले नाही, त्यामुळे चोरांचे फावले आहे. नोकरीच्या शोधात बेकारांची संख्या वाढत आहे. आई-वडिलांच्या लाडामुळे पॉकेटमनी मिळविणारी बेकारांची फौज निर्माण झाली आहे. हा पॉकेटमनी या तरुणांच्या ऐषआरामाला पुरत नाही, त्यामुळे काही तरुणांनी फ्लॅटवर लक्ष ठेवून पॉकेटमनी मिळविणारी संस्कृती जोपासली असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांतील चोऱ्यांचा अभ्यास करता उघड झाले आहे. या चोऱ्यांमुळे लोक मात्र हैराण झाले आहेत.