शहरातील पेठ रोडवरील इमारतीतील सदनिकेत रविवारी दुपारी तीन जणांचे मृतदेह आढळून आले. संबंधितांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पेठ रोडवरील मेहेरधाम परिसरातील राजमुद्रा सोसायटीत ही घटना घडली. इमारतीतील सदनिका क्रमांक तीनमधून दरुगधी येत असल्याचे शेजारील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदनिकेची तपासणी केली असता अलकाबाई भवर (४०), त्यांची मुलगी प्रिया (१७) आणि हुसेन नावाचा युवक असे तीन जण मृतावस्थेत आढळून आले.
विषारी औषधाच्या सेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
हुसेन भवर कुटुंबियांशी परिचित होता. त्याचे नेहेमी त्यांच्याकडे येणे-जाणे होते, असे माहिती शेजारील नागरिकांकडून सांगण्यात आले.