लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात गुरुवारी (दि. १७) मतदान होत आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी उद्या, बुधवारी मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचा-यांकडे मतदानाचे साहित्य सुपूर्द केले जाणार आहेत, हे कर्मचारी केंद्रांवर सायंकाळी पोहोचतील. मतदानाचे साहित्य ताब्यात घेतल्यापासून ते मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे परत ताब्यात येईपर्यंत या कर्मचा-यांशी सातत्याने संपर्क राहावा यासाठी ‘एसएमएस’ सेवेचा संपर्क प्लॅन राबवला जाणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. नगर मतदारसंघात १६ लाख ९५ हजार २६५ तर शिर्डी मतदारसंघात १४ लाख ५९ हजार १२२ असे एकुण ३१ लाख ५४ हजार ३८७ मतदार आहेत. त्यासाठी एकूण ३ हजार ५८१ (१४ साहाय्यकरी केंद्रे) आहेत. तेवढीच मतदान यंत्रे आहेत, शिवाय ६२० यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानासाठी एकूण सुमारे २० हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ आहे. मतदान केंद्रावर जाण्या व येण्यासाठी प्रत्येक विधानसभा केंद्रावरून प्रत्येकी ५ बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रवासाचा खर्च संबंधित कर्मचा-यांनाच करावा लागणार आहे.
आचारसंहिता भंगाच्या नगरमध्ये २१ व शिर्डीत ९ अशा एकूण ३० तक्रारी दाखल करण्यात आल्या, त्यातील चौकशी करून १७ व ७ अशा एकूण २४ निकाली काढण्यात आल्या, २१ गुन्हे दाखल करण्यात आले. इतर तक्रारींवर अहवाल मागवण्यात आला आहे.
जिल्ह्य़ात ४६ व १७ अशी एकूण ६२ संवेदनशील केंद्रे आहेत. या प्रत्येक ठिकाणी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत व तेथे व्हिडीओ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यातील नगर शहरातील ६ ठिकाणी वेब कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
उमेदवाराचा एकच बूथ
उमेदवारांना मतदान केंद्राबाहेर केवळ एकच १० बाय १० चा बूथ पूर्वपरवानगीने टाकता येईल, मात्र तेथून त्याला प्रचार करता येणार नाही की निवडणूक चिन्ह असलेल्या मतदानाच्या चिठ्ठया देता येणार नाहीत. केवळ मतदारांना मार्गदर्शन करता येईल. या बूथची आगाऊ सूचना निवडणूक अधिका-यांना देणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर सरकारी निवडणूक यंत्रणेचाही एक स्वतंत्र बूथ असेल तेथे मतदारांना मतदानाच्या चिठ्ठया उपलब्ध होणार आहेत. या यंत्रणेने घरोघर चिठ्ठय़ा पोहोचवल्या आहेत, ज्यांना मिळाल्या नसतील त्यांना केंद्रावरील सरकारी बूथवर उपलब्ध होणार आहेत.