नगर शहरातील उड्डाणपूल, बायपाससह नगर-शिर्डी रस्ता, निळवंडे धरण, भागडा चारी, वांबोरी चारी आदी जिल्ह्य़ांतील प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्ह्य़ाचा पर्यटन विकासाचा अाराखडा तयार केला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
सरकारी विश्रामगृहावर ते बोलत होते. निवडणूककाळात पक्षाने दिलेले आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ात पर्यंटन विकासाला संधी आहे, येथे काय सुविधा आहेत व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय सुविधा देता येतील, याचा आराखडा तयार केला जाणार आहे, तो मार्गी लावण्यासाठीही प्रयत्न करू, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसारखीच मुख्यमंत्री सडक योजना जाहीर करण्यात आली आहे. गेल्या ६५ वर्षांत ज्या खेडय़ांना रस्ते मिळाले नाहीत, अशा जिल्ह्य़ातील गावांना त्या माध्यमातून रस्ते उपलब्ध केले जातील, जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी जास्तीतजास्त निधी देण्याचा प्रयत्न करू, टँकरमुक्तीसाठी पाणी योजना व्यवस्थित चालवल्या जाण्यावर भर दिला जाणार आहे, बहुतेक पाणी योजना उदभव कोरडे पडणे, देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसणे व थकीत वीजबिलामुळे बंद पडतात, यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजनांचाही समावेश आहे, त्याबद्दल सरकार गांभीर्याने विचार करत आहे, जिल्ह्य़ातील या परिस्थितीचाही आढावा घेऊन उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात स्वतंत्र बैठक बोलवली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नगरचे पालकमंत्री तुम्हीच आहात का?
 नागपूरचे अधिवेशन संपण्यापूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर होईल, अशी अपेक्षा मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केली. यादी तयार आहे, एका जिल्ह्य़ातील मंत्री दुस-या जिल्ह्य़ात पालकमंत्री म्हणून नियुक्त न करण्याचेही ठरले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरचे पालकमंत्री तुम्हीच आहात का, या प्रश्नावर त्यांनी ‘दुसरा काही पर्याय नाही’ असे उत्तर दिले.