थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान नावारूपास आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात इथे पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. मात्र अलीकडच्या काळात दिवाळी आणि सलग सुट्टय़ांमध्येही पर्यटक माथेरानमध्ये दाखल होऊ  लागले आहेत. दिवाळीच्या सुट्टीसाठी माथेरानमध्ये  आरक्षण झाले आहे. महाबळेश्वरही सुटीत गजबजणार आहे. एकूणच दिवाळीत पर्यटनाला जाण्याकडे कल वाढत आहे.

हिरवागार निसर्ग, लाल मातीच्या वाटा, घोडय़ांच्या टापांचा आवाज, पक्षी आणि कीटकांचा किलकिलाट, सर्वत्र बागडणारी माकडे, कडेकपारीतून वाट काढत धावणारी मिनी ट्रेन आणि धुक्यामधून डोकावणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विरंगुळ्यासाठी माथेरान हे कायमच पसंतीला उतरले आहे.

ब्रिटिश कलेक्टर सर एच. सी. मॅलेट यांनी २१ मे १८५० ला माथेरानचा शोध लावला. येथील अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल या पर्यटन व्यवसायातून होत आहे. वाहनांना १०० टक्के बंदी असणारे हे राज्यातील एकमेव ठिकाण आहे.

काळानुरूप माथेरानच्या जडणघडणीत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बदल होत गेले आहेत. १९०७ साली माथेरानला सर आदमजी पिरभाय यांनी मिनी ट्रेनने जोडले होते. त्या काळी २२ लाख रुपये खर्चून ही रेल्वे सुरू करण्यात आली होती.  गेल्या मे महिन्यापासून ही रेल्वे सेवा खंडित असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. तरी व्हॅली क्रॉसिंग, जंगल ट्रेकिंग, घोडसवारी यांसारखे साहसी प्रकार आणि आकाशदर्शन प्रकल्प प्रमुख आकर्षण आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे माथेरान पूर्वी उन्हाळ्यात गजबजलेले असायचे. मात्र आता वर्षभर पर्यटक असतात. या दिवाळीत माथेरानमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल होणार आहेत. माथेरानमध्ये लहान-मोठे ३५० हॉटेल्स व्यवसायिक आहेत. यातील जवळपास आरक्षण पूर्ण झाले आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवसापासून तीन दिवस माथेरानच्या दिवाळी पर्यटन हंगामाला सुरुवात होत असते. या वर्षी मोठय़ा प्रमाणात आरक्षणाबाबत चौकशी सुरू आहे. माथेरान रेल्वे  ८ मेपासून बंद असल्यामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाने किमान माथेरान ते अमन लॉज रेल्वे सेवा सुरू करावी, यामुळे पर्यटकांचा ओघ माथेरानमध्ये वाढण्यास सुरुवात होईल. – अजय सावंत, माजी नगराध्यक्ष, माथेरान

माथेरानमध्ये शनिवार-रविवार साधारणपणे ३ हजार पर्यटक येत असतात. दिवाळीच्या सुट्टीत ही दुप्पट होते. या वर्षीपण दिवाळीच्या सुट्टीत १५ ते २० हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. ५ नोव्हेंबपर्यंत बहुतेक मोठय़ा हॉटेल्सची ८० ते ९० टक्के बुकिंग पूर्ण झाली आहेत.  – मनोज खेडकर, हॉटेल व्यावसायिक

 

 

झटपट सहलीसाठी महाबळेश्वरचा पर्याय

विश्वास पवार : कमीतकमी वेळेत मोठी सहल म्हणून गेल्या काही दिवसांत महाबळेश्वरचे पर्यटन  नावारूपाला येऊ लागले आहे. प्रवासाच्या वेळेत बचत साधत जास्तीतजास्त निवांतपणासाठी पुण्या-मुंबईचे अनेक पर्यटक या पर्यटनस्थळास पसंती देत आहेत.

महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे ब्रिटिश काळापासूनचे पर्यटनस्थळ. थंड हवेचे ठिकाण. या निसर्गरम्य स्थळाने सुरुवातीपासूनच पर्यटकांना मोहिनी घातली आहे. तरुणाईपासून ते कुटुंबवत्सल अशा विविध गटांतील पर्यटक इथे पूर्वीपासून येत आहेत. यामध्ये हे आलेले पर्यटक चार ते पाच दिवस इथे राहत, फिरत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सुधारलेले दळणवळण, वाहतूक साधनांची उपलब्धता, मध्यमवर्ग, नोकरदारांकडेही खेळू लागलेला पैसा आणि अनेक उद्योगांमधील ५ दिवसांच्या आठवडय़ामुळे उपलब्ध झालेला वेळ या साऱ्यांमुळे महाबळेश्वर स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांमध्ये मूलभूत फरक पडला आहे. खिशात असलेला पैसा, हाताशी असलेला वेळ आणि दारात असलेले वाहन यामुळे आता पुण्या-मुंबई शहरापासून महाराष्ट्रातील अनेक छोटय़ा-मोठय़ा शहरातील लोक एक-दोन दिवसांसाठीही महाबळेश्वरकडे धावू लागले आहेत. यामध्येच कुठल्याही सणांची जोडून सुट्टी आल्यावर या गर्दीत मोठी वाढ होते. आता इथल्या बहुतेक निवास व्यवस्थांचे आरक्षण हे ‘ऑनलाइन’ पद्धतीनेही होत असल्याने अगदी सुट्टीच्या आदल्या दिवशी निर्णय घेत पर्यटक महाबळेश्वरकडे धावू लागतात.

अनेक सण – उत्सव साजऱ्या करण्याच्या कल्पनांमध्ये आता बदल होऊ लागले आहेत. पूर्वी घरीच साजरी केली जाणारी दिवाळी आता अनेक मित्र त्यांची कुटुंबे अशा पर्यटनस्थळी एखादा बंगला भाडय़ाने घेतही साजरा करू लागले आहेत. पर्यटनस्थळी जाऊन काही पाहणे यापेक्षाही आता अनेक पर्यटक तिथपर्यंतच्या प्रवासाला महत्त्व देत आहेत. दुचाकीवरचे तरुणांचे गट, सायकल चालवणारे गट, ट्रेकिंग करणारी मुले या साऱ्यांना महाबळेश्वपर्यंतच्या प्रवासातच रस असतो. अशा पर्यटनासाठीही महाबळेश्वर हे नवे पर्यटनस्थळ ठरू लागले आहे.