नोटाबंदीमुळे दक्षिणाही आता ऑनलाइन

हजार आणि पाचशेच्या नोटबंदीला आज महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या चलन तुटवडय़ाचा फटका थेट महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पूजेलाही बसला आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या आहेत. तर त्यापेक्षा कमी मूल्यांच्या नोटांचा तुटवडा असल्यामुळे तुळजाभवानीची पूजा उधारीवर सुरू आहे.

तुळजाभवानी मंदिर उघडल्यानंतर पहाटेपासून भाविकांच्या विधिवत पूजा सुरू होतात. सकाळी ७ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत अभिषेक पूजा आणि त्यानंतर दर्शन, सायंकाळी ७ ते ९ या कालावधीतील पुन्हा विधिवत पूजा सुरू जातात. सकाळी आणि सायंकाळी मिळून दिवसभरात हजाराहून अधिक अभिषेक पूजा, अलंकार पूजा, ओटी पूजा पार पाडल्या जातात. अभिषेक पूजेसाठी ३५१, ५५१, एक हजार रुपये, असे भाविकांच्या क्षमतेनुसार दर आकारले जातात. पाचशे आणि हजारांच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे या पूजाविधीसाठी रोख स्वरूपात लागणाऱ्या शंभर रुपयांच्या नोटांचा तुळजाभवानी मंदिरात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी भाविकांना त्रास होऊ नये, याची खबरदारी पुजारी वर्गातून घेतली जात आहे. काही पुजारी जुन्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारून पूजा करीत आहेत. हे ज्यांना शक्य नाही, ते उधारीवर पूजा घालून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या भाविकांची गरसोय टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.  नोटबंदीच्या निर्णयानंतर मागील महिनाभरापासून तुळजाभवानी मंदिरातील गर्दीत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. बुधवारी अष्टमीच्या मुहूर्तावर भाविकांच्या संख्येत वाढ झाली असल्याची प्रतिक्रिया पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी दिली. मात्र नोटाबंदीचा परिणाम भाविकांसह तुळजापूर शहरातील व्यापारी आणि पुजारी वर्गाला जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

उधारीवर पूजा

‘‘मुंबई येथील सात भाविक तुळजाभवानी मातेची अभिषेक अलंकार पूजा करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्यामुळे अभिषेक पूजेसाठी लागणारे ३५१ रुपये रोख स्वरूपात उपलब्ध नव्हते. त्यांच्याकडून रोख पसे न घेता जगदंबेचे दर्शन घडवून दिले, पूजा केली. दर्शनाने समाधान झाल्यानंतर त्यांनी बँकेचे खातेक्रमांक घेऊन मुंबईला परतल्यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्र बँकेच्या आपल्या खात्यावर ३५१ रुपये जमा करून दक्षिणा अदा केली. ’’ – बाळासाहेब भोसले