सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाला निघालेल्या एका गाडीला झालेल्या अपघातात मंगळवारी दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. हे सर्वजण तासगाव तालुक्यातील वायफळे गावातील रहिवासी आहेत. मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला.
धनाजी पांडुरंग पाटील (वय ३६) व भास्कर दत्तू पाटील (वय ४८) असे मृत्युमुखी पडलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत. तर हणमंत पाटील (वय ४०), बाळासो गणपती पाटील (वय ४४), अनिल तुकाराम पाटील चालक (वय ४४), शिवाजी बाबुराव पाटील (वय ३८), रामचंद्र गोविंद नलवडे (वय ६०) ही जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. जखमींवर तासगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण इनोव्हा गाडीतून जात असताना गौरगाव फाटीजवळ अपघात झाला.
विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून मंगळवारी सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चालाही इतर ठिकाणांप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून अनेक लोक या मोर्चासाठी शहरामध्ये आले होते.