मुंबई-गोवा महामार्गावर कुवे गावाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास आयशर टेम्पो व लक्झरी बसची समोरासमोर टक्कर होऊन दोन्ही गाडय़ांचे चालक जागीच ठार झाले. बसमधील सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून गोव्याकडे चाललेला आयशर टेम्पो व गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसची लांजा तालुक्यातील कुवे गावाजवळ एका अवघड वळणावर समोरासमोर टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाडय़ांच्या केबिनचा चक्काचूर झाला. तसेच गाडय़ांच्या चालकांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. दोघांचाही चालकाच्या आसनावरच मृत्यू ओढवला. यापैकी बसचालकाचे नाव रॉकी व्ॉस (वय ४८) असून टेम्पो चालकाचे नाव युवराज निकम (वय २८) आहे. अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे – महम्मद मक्सद मदगे मणी (वय २८ वष्रे), झहिरी डिसोझा (वय २९), फनार्ंडिस डिसोझा (वय ५५), मॅथ्यू सोनजा (वय ४९), सोफिन्यू (वय ४९) आणि जॉन्सन (वय ४३) सर्व जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर आयशर टेम्पोमधील रंगाचे बॅरल रस्त्यावर पडून फुटल्यामुळे सर्वत्र रंग सांडले होते. त्यावरून इतर गाडय़ा घसरू लागल्यामुळे सुमारे दीड तास वाहतूक बंद ठेवावी लागली.