दोघांना वाचवण्यात यश; माळशिरसमधील घटना

माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील उजनी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात मामासोबत पोहण्यासाठी गेलेली चार शाळकरी भावंडे पाण्यात बुडाली. त्यापैकी दोघा मुलांना वाचविण्यात यश आले तर इतर दोघा मुलांचा शोध घेतला जात आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शाळेच्या उन्हाळी सुट्टीत मुंबईहून श्रीपूर येथे मामाच्या गावी आलेल्या मुलांवर हा जीवघेणा प्रसंग बेतला.

ओम सतीश लोणी (वय १३) व प्रसन्न सतीश लोणी (वय १०) ही दोन भावंडे कालव्यातील पाण्यात पोहताना वाहून गेली असून त्यांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत लागला नव्हता. तर विराज संतोष शिवणगी व विकी संतोष शिवणगी या दोघा भावंडांना पाण्यातून वाहत जाताना वाचविण्यात यश आले. ही चार मुले मुंबईतील राहणारी असून ती आपल्या कुटुंबीयांसह उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी श्रीपूर (ता. माळशिरस) येथे आली होती. श्रीपूरजवळील बोरगाव येथे उजनी कालव्यात ही मुले पोहण्यासाठी गेली होती. परंतु पोहण्याचा सराव नसल्याने आणि कालव्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही कालव्यातील पाण्यात बुडाली.

त्यावेळी आरडाओरडा झाला. बुडालेल्या दोन मुलांना पाण्याबाहेर काढले गेले. त्यासाठी रोहीत साठे या तरुणाने धाडस दाखवून बचावकार्य केले. अन्य दोघांचा शोध लागला नाही. या घटनेमुळे बोरगाव व श्रीपूर येथे हळहळ व्यक्त होत आहे.