दर्डाच्या शाळेतील लंगिक अत्याचार प्रकरण
येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या यवतमाळ पब्लिक स्कूल अर्थात ‘वायपीएस’मधील लंगिक अत्याचार प्रकरणातील दोन शिक्षक आरोपी अमोल क्षीरसागर, यश बोरूंदिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना यापूर्वी शुक्रवापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.
विशेष हे की, २९ जूनला प्रकरण उघडकीस आल्यानंतर या शिक्षकांना प्रथम काही दिवस पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याविरुध्द पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्याने पोलिसांनी त्यांना कारागृहात जाऊन अटक केली होती व काल, २२ जुलपर्यंत पीसीआर घेण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांच्यासमोर काल हजर करण्यात आल्यावर या आरोपी शिक्षकांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणातील आरोपी वायपीएसचे सचिव किशोर दर्डा आणि मुख्याध्यापक जेकब दास जामिनावर सुटले आहेत. गुन्हा सिध्द झाल्यास दोन शिक्षकांना १० वष्रे सक्तमजुरी किंवा जास्तीत जास्त जन्मठेपेचीही शिक्षा, तर संस्था सचिव आणि मुख्याध्यापकांना १ वर्षांची शिक्षा होऊ शकते. वायपीएस चालवणारी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी ही संस्था अल्पसंख्याक प्रवर्गात मोडत असून त्यासंबंधी असलेल्या वेगळ्या कायदेशीर तरतुदी काय आहेत ते तपासून काय कारवाई करता येते, याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.

मानसिकरोगतज्ज्ञांकडून तपासणी
न्यायालयीन कोठडीतून या दोन्ही शिक्षक आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली त्या काळात म्हणजेच, बुधवार, २० जुलैला त्यांची मानसिक रोगतज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. मुंबईहून आलेले मानसिकरोगतज्ज्ञ नागपुरात होते, त्यामुळे आरोपींना नागपूरला नेऊन तपासणी करण्यात आली.