नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार न केल्याच्या मुद्यावरून कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षात सध्या मोठा असंतोष खदखदत आहे. निकालाची वाट बघत असलेले या दोन्ही पक्षातील नेते आताच एकमेकांना संपवण्याची भाषा बोलू लागल्याने निकालानंतर मोठा भडका उडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.
यावेळच्या निवडणुकीत या मतदार संघात भाजप, कॉंग्रेस व आम आदमी पक्षात अखेपर्यंत चुरशीचा सामना रंगला. यावेळी मतदान सुध्दा ५ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे निकालाविषयी राजकीय वर्तुळात कमालीची उत्सूकता आहे. यावेळची निवडणूक गटबाजी व कुरघोडीच्या राजकारणाने सुध्दा चर्चेत राहिली. या पध्दतीच्या राजकारणाचा फटका कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना सहन करावा लागला. कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात येथील एका गटाने उघडपणे काम केले. या गटाने आम आदमी पक्षाचा झाडू हाती धरला होता. कॉंग्रेसचा पराभव करणे हे एकच उद्दिष्ट त्यामागे होते. आता विरोधात काम करणाऱ्या या गटाला बाहेरचा रस्ता कसा दाखवायचा, यावर उमेदवाराच्या वर्तुळात खल सुरू झाला आहे. या गटातील नेत्यांवर कारवाई करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसने सुध्दा हिरवा कंदील दाखवला आहे. कारवाईची पत्रे सुध्दा तयार आहेत. ती केव्हा प्रसिध्दीला द्यायची, यावर सध्या विचारमंथन सुरू आहे. निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतली, असे कारण देत विरोधकांना बाहेरचा रस्ता दाखवून मैदान साफ करायचे मनसुबे सध्या आखले जात आहेत. कारवाई कुणावर करायची आणि त्याच्या जागी कुणाला बसवायचे, यावरही चर्चा सुरू झाली आहे. शिस्तभंगाची कारवाई निकालाच्या आधी करायची की नंतर, यावर सध्या नेते चर्चेत व्यस्त आहेत.  
 हाच प्रकार भारतीय जनता पक्षात सुध्दा सुरू झाला आहे. मात्र, आजवर सभ्यतेची ग्वाही देणाऱ्या या पक्षात बदनामीच्या माध्यमातून एकमेकांवर सुड उगवण्याचे ओंगळ राजकारण सुरू झाले आहे. शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला नाही, हा मुख्य आक्षेप सध्या या पक्षात घेतला जात आहे. नेत्यांच्या वर्तुळात सध्या याचीच चर्चा आहे. या कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची भाषा सध्या बोलली जात आहे. यातूनच हे बदनामीचे राजकारण सुरू झाले आहे. शहराची जबाबदारी असलेल्या एका पदाधिकाऱ्याला यातून लक्ष्य केले जात आहे. त्यासाठी माध्यमांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न सुध्दा होत आहे. सोशल साईटवर सुध्दा या पदाधिकाऱ्याची यथेच्छ बदनामी केली जात आहे. या बदनामीच्या राजकारणामुळे भाजपचे अंतर्गत वर्तुळ सध्या ढवळून निघाले आहे. प्रचाराच्या काळात वेगवेगळ्या नेत्यांवर निष्ठा ठेवून असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला नाही, हाच मुद्दा सध्या पक्षात चर्चेचा विषय ठरला आहे. ही चर्चा खोटी असून बदनामीचे राजकारण खपवून घेणार नाही, अशा भाषेत त्याला प्रत्युत्तर सुध्दा दिले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे या दोन्ही पक्षात काहीही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले असून निकालानंतर या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता वाढली आहे.