वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ज्वार संशोधन केंद्रानजीक विद्यापीठाच्या जागेवर झालेले अतिक्रमण मंगळवारी हटविण्यात आले. त्यामुळे जवळपास २० ते २५ लोकांचे संसार उघडय़ावर आले.
साखला प्लॉटच्या दक्षिण बाजूस विद्यापीठाच्या दोन-तीन एकर क्षेत्रावर गेल्या सात-आठ वर्षांपासून अतिक्रमण झाले होते. २००६-०७ च्या दरम्यान विद्यापीठाने ही जमीन महावितरण कंपनीला हस्तांतरीत केली. या जागेपकी केवळ आठ-दहा गुंठे क्षेत्र महावितरणने ताब्यात घेऊन उपकेंद्र उभारण्यात आले. दरम्यानच्या काळात उर्वरित रिकाम्या जागेवर काही लोकांनी प्लॉट पाडून नोटरीद्वारे विक्री केली. या प्रकरणात २०-२५ जण अडकले. या लोकांनी नोटरीआधारे विद्यापीठाच्या अतिक्रमित जागेवर तात्पुरते शेड मारून घरे उभारली. विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण होत असताना त्यांना महावितरण किंवा विद्यापीठाकडून कोणतीही आडकाठी झाली नाही. महावितरणला जागा हस्तांतरण केल्यानंतर विद्यापीठाला मोबदला मिळाला, तर महावितरणने आठ-दहा गुंठय़ांतच उपकेंद्र उभारल्याने उर्वरित रिकाम्या जागेशी आपला संबंध नाही, अशा द्विधा परिस्थितीत विद्यापीठ व महावितरण असताना काही लोकांनी नोटरी करून प्लॉट विकले. परंतु गेल्या ऑक्टोबरमध्ये महावितरणने सर्व जागा ताब्यात घेतली नाही, असे विद्यापीठाला कळविल्यानंतर विद्यापीठाने जाहीर सूचना काढून या जागेवर अतिक्रमण करू नये, असे कळविले. तरीही अतिक्रमण होत राहिले.
मंगळवारी सकाळी साडेसहा-सातच्या सुमारास विद्यापीठाचे कुलसचिव नागोला यांच्यासह कर्मचारी व कोतवालीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोनच दिवसांपूर्वी संबंधित सर्वाना अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण हटवितांना नागरिकांचा विरोध झाला नाही. दुपापर्यंत सर्व अतिक्रमणधारकांनी आपले सामान हलविले. या जागेवर विद्यापीठाकडून नांगरणी करून घेण्यात आली. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून संरक्षण िभत बांधण्यात येणार असल्याची माहिती नागोले यांनी दिली.