दंगलीचा लगेच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल असे सांगत दंगलीचा चौकशी अहवाल वरिष्ठांना दिल्यानंतर न्यायालयीन चौकशी होऊ शकेल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी येथे दिली. अहमद हे दंगलीच्या प्राथमिक चौकशीसाठी येथे आले आहेत. दरम्यान पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने दंगलीतील मृतांची संख्या पाच झाली आहे. दंगलग्रस्त भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी महंमद रियाज हसन शहा (२१) याचा मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती जावेद अहमद यांनी पत्रकारांना दिली. दंगलीमागील सूत्रधार कोण, दंगलीला राजकीय पाश्र्वभूमी आहे काय, हे सर्व चौकशीत स्पष्ट होईल. विविध लोकांकडून सध्या निवेदने देण्यात येत असून त्यातील मुद्दय़ांचा चौकशीसाठी उपयोग होऊ शकेल. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी नियमानुसारच गोळीबार केला किंवा कसे, हेही पाहण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांच्यासह पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे उपस्थित होते. दरम्यान, दंगलग्रस्त भागाजवळील आग्रारोड परिसरात काही प्रमाणात रहदारी सुरू झाल्याने परिस्थितीतील तणाव काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.
२००८ मध्ये उसळलेली दंगल धर्माध विचारांना खतपाणी घालणारी होती की काय, असे वारंवार उद्भवणाऱ्या अशा घटनांमधून जाणवू लागले असल्याची प्रतिक्रिया विविध वसाहतींमधून व्यक्त होऊ लागली आहे. समाजामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवरच आता कठोर कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे. २००८ च्या दंगलीत निरपराध लोक मारले गेले आणि शेकडो जण जखमी झाले होते. तसाच काहीसा कित्ता पुन्हा एकदा जातीय शक्तींनी धुळ्यात गिरविल्याचे दिसत आहे. त्यावेळी दंगलखोरांनी सशस्त्र पोलीस अधिकारी, शिपायांनाही लक्ष केले होते. पोलिसांची वाहने पेटविणे आणि बेधडकपणे पुढे जाऊन दगडांचा वर्षांव करण्याची हिम्मत केली होती. संतप्त जमाव सशस्त्र पोलिसांनाही पिटाळून लावू शकतो, याचा अनुभव असलेले ‘म्होरके’च यावेळी दंगल माजविण्यासाठी पुढे आल्याचे दिसले. मच्छिबाजार, आझादनगर, मौलवीगंज, हजारखोली, वडजाई रस्ता, गल्ली क्रमांक पाच व सहा, देवपूर, विटाभट्टी किंवा मोगलाई हे सर्वच भाग विशिष्ट एका समाजाशी निगडित असले तरी लगतच अन्य समाजाच्या वसाहती आहेत. अशा दोन समूहातल्या वस्त्यांच्या सीमेवरील गल्लीबोळात दंगलीचे लोण तत्काळ पसरते. दंगल कधीही होऊ शकते, असा समज करून घेत काही कुटुंबीयांनी स्वसंरक्षणार्थ म्हणा किंवा इतर कारणास्तव रसायने किंवा स्फोटके साठवून ठेवल्याचेही प्रकार पोलिसांनी शोधून काढले होते.
संवेदनशील भागात रुजलेली जातीयवादाची मानसिकता वेळोवेळी दंगली घडवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. या पाश्र्वभूमीवर ठोस अशी पावले टाकून प्रशासनाने संभाव्य दंगली टाळाव्यात, अशी अपेक्षा धुळेकर व्यक्त करीत आहेत.