राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जानकर मोबाईलवरून एका प्रशासकीय अधिकाऱ्याला विरोधकांचे अर्ज बाद करण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानकर फोनवरुन प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणताना दिसत आहेत. विविध वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे.

‘नगराध्यक्षपदासाठी तुमच्याकडे दोन अर्ज येतील. त्यातील एक अर्ज काँग्रेसचा असेल, दुसरा अपक्ष म्हणून असेल. त्यातील काँग्रेसचा अर्ज बाद करा. मोटवानी तुमच्याकडे अर्ज घेऊन येतील. त्यांना कपबशीचे चिन्ह द्या,’ अशा शब्दांमध्ये जानकर या व्हिडीओ क्लिपमध्ये बोलताना दिसत आहेत. याशिवाय ‘मी वर्षा वरुन बोलतो आहे. मी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर बोलतो आहे’, असेदेखील जानकर या व्हिडीओमध्ये समोरच्याला सांगत आहेत.

गडचिरोलीत वडसा नगरपालिकेसाठी पुढील टप्प्यात निवडणूक होणार आहे. या नगरपालिकेत काँग्रेसचे जेसालाल मोटवानी दोन वेळा नगराध्यक्ष राहिले आहेत. मात्र यंदा नगराध्यक्ष महिलेसाठी राखीव झाल्याने मोटवानी यांनी त्यांच्या सुनेला उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने मोटवानी यांच्या सुनेला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मोटवानी यांनी सुनेला निवडून आणण्यासाठी एक पॅनल तयार केले. या पॅनलला महादेव जानकर यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या पॅनलला कपबशी चिन्ह द्यावे, यासाठी जानकर दबाव आणताना दिसत आहेत.

काँग्रेसचा अर्ज बाद करा, मोटवानींना मदत करा, त्यांच्या पॅनलला कपबशीचे चिन्ह द्या, असे महादेव जानकर फोनवर बोलताना दिसत आहेत.
मात्र जानकर यांनी या सगळ्याचा इन्कार केला आहे. ‘मी कोणालाही कोणतीही धमकी दिलेली नाही. मी फक्त त्यांनी विनंती केली. आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे. मी संविधानाच्या तरतुदींचे उल्लंघन केलेले नाही,’ अशी सारवासारव जानकर यांनी केली आहे.

याप्रकरणी काँग्रेससह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ या प्रकरणात निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे. काँग्रेस पक्ष जानकरांविरोधात तक्रारदेखील दाखल करणार आहे.