शेतकरी प्रश्नावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची अवस्था एखाद्या विनोदी नटासारखी झाली आहे. त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’तील कलाकारांनाही मागे टाकले आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेनेने सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला विरोध केला. पण नंतर सत्तेत एकत्र आले. यावरून शिवसेनेचे नेतृत्त्व गोंधळल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी सरकारविरोधात काढलेल्या संघर्ष यात्रेचा आज सांगलीत शेवट होत आहे. संघर्ष यात्रेनिमित्त झालेल्या सभेत राधाकृष्ण विखेंनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. २२ तारखेपर्यंत टोकन असणाऱ्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे विखे म्हणाले. तूरीचा प्रश्न निर्माण होणे पणन आणि कृषिमंत्र्यांचे अपयश असून कृषी आणि पणन मंत्र्यांची तात्काळ हाकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरही त्यांनी तोफ डागली. शेतकरी हवालदिल झाला असताना तोंडाला पट्ट्या लावून शांत बसलेले खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या संघटनेमधील स्वाभिमानी हा शब्द काढून टाकावा, असे आव्हानही त्यांनी दिले. सदाभाऊ भाजपसारखे ‘इव्हेंट मॅनेजमेन्ट’ करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, असेही ते म्हणाले.

सांगलीतील संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झाले आहेत. विशेष अधिवेशन बोलवून सरकारने कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांवर निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. कर्जबारी शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करता येत नसेल तर, सरकारने राज्य कारभार करणे सोडून द्यावे, अशी तोफ डागली. कर्जमाफी असो किंवा तूर खरेदी सरकारला यावर निर्णय घ्यावाच लागेल. अन्यथा आम्ही टोकाची भूमिका घेऊ, असा इशाराही त्यांनी केला. दारू आणि बिअरवरील कर कमी झाला म्हणून हे सरकार पेट्रोलवर अधिक कर आकारत आहे, असा आरोप करून हे फडणवीस सरकार जुलमी असल्याचेही ते म्हणाले.