गावातील पाणीटंचाईचे संकट दूर करावे यावरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवकात झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होण्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरडय़ाची वाडी येथे घडली. याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामसेवकाने तक्रार दिली आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईने बिकट स्वरूप धारण केले आहे. बरडय़ाची वाडी येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी गावालगतच्या झिरप्याचा वापर करावा लागत आहे. परंतु या झिरप्यात गाळाचे प्रमाण वाढल्याने त्याद्वारे तहान भागविणे क्रमप्राप्त ठरले आहे. पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असलेल्या झिरप्याची किमान सफाई करावी, जेणेकरून स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होईल यासाठी त्याची खोली वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी गणेश पगारे यांच्याकडे अनेकदा केली होती. मात्र, ग्रामसेवकाने त्याकडे दुर्लक्ष केले. उलट प्रथम शौचालये बांधा, गावात दारुबंदी करा आणि नंतर कामे सांगा, अशी भूमिका घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्रामसेवक गावात आला असता ग्रामस्थांनी पुन्हा झिरपा स्वच्छ करण्याची मागणी लावून धरली. या वेळी ग्रामस्थ आणि ग्रामसेवक यांच्यात बाचाबाची होऊन नंतर हाणामारी झाली. या घटनेनंतर रामदास शिंदे याने मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवकाने घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आदिवासी वस्तीतील ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत प्रशासकीय यंत्रणा पिण्याचे पाणी मागणाऱ्यांवर बनावट गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.