‘कंटूर शेतीची तयारी सुरू

कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारक साकारणारे एकनाथ रानडे यांचे जन्मगाव म्हणून ओळख असलेल्या टिमटाळा या गावाची सांसद आदर्श ग्राम योजनेत निवड झाल्यानंतर आता या गावाच्या परिसरात जलनियोजनाचे काम सुरू झाले आहे. प्रत्येक गावाचे जलअंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेल्या टिमटाळा आणि ऋणमोचन या गावांच्या परिसरातील ८ गावांच्या जलव्यवस्थापनाबाबत नियोजन करण्यासाठी ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ अरविंद नळकांडे आणि गंगोत्री एनर्जी प्रोजेक्ट्सच्या वतीने ‘अर्बन डिझायनर’ अनिकेत कुळकर्णी यांनी आठही गावांमध्ये नुकतीच गावकऱ्यांसोबत चर्चा केली. प्रत्येक गावाचे जलअंदाजपत्रक मांडले. याबरोबरच शेती ऊताराच्या अनुषंगाने नांगरणी करण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. गावतलाव आणि विहिरींची पाहणी करण्यात आली. जलसंवर्धनासोबतच मृदा संवर्धनाचे काम गावकऱ्यांना पटवून देण्यात आले. यावर्षीच्या पावसात अधिकाधिक पाणी जमिनीत मुरवण्यासाठी, भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि गावपातळीवर पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलनियोजनात प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यात गावांमधील सार्वजनिक तलावांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि विस्तारीकरण करणे, अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि पुनर्भरण खड्डे खोदणे, खासगी आणि सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण आणि गाळ काढणे, शेती उताराच्या अनुषंगाने नांगरणी करणे, नवीन खाजगी शेततळी आणि सार्वजनिक तलाव करणे यांचा समावेश आहे.

गावकऱ्यांसोबतच झालेल्या चर्चेला उत्तम असा प्रतिसाद मिळाला असून ८ गावांमधील ८५ शेतकरी हे आपल्या शेतांमध्ये शेततळी बनवण्यास तयार झाले आहेत. शेती उताराच्या अनुषंगाने नांगरणी करण्यासाठी कंटूर मार्कर्स उपलब्ध करून देण्यात आले. शेतकऱ्यांनी कंटूर फार्मिग करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती अरविंद नळकांडे यांनी दिली.

टिमटाळा येथे भूजल सर्वेक्षणापासून ते गोशाळा उभारणी, पांदण रस्ते, व्यसनमुक्ती असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. नागपूर- बडनेरा रेल्वे मार्गावरील टिमटाळा हे छोटेसे रेल्वे स्टेशन. याच जेमतेम पाचशे लोकवस्ती असलेल्या गावात १९ नोव्हेंबर १९१४ रोजी एकनाथ रानडे यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील रामकृष्ण रानडे हे त्यावेळी टिमटाळा येथे स्टेशन मास्टर होते. रेल्वे स्थानक परिसरातच रानडे कुटुंबीय राहत होते. नंतर रानडे यांची बदली नागपूर येथे झाली. पण, एकनाथ रानडे यांची जन्मभूमी म्हणून टिमटाळयाची ओळख कायम राहिली. टिमटाळासोबतच जनुना, निरसाना, खिरसाना, टिमटाळा या चार गावांमधील विकास कामांसाठी २ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.