कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला रेल्वे मंत्रालयाने प्राधान्य दिले असून त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार आहे. देशातील ४०० रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याला कॅबिनेट बैठकीत मान्यता मिळाली आहे. जगातील बारा देशांतील रेल्वेच्या पायाभूत सुविधा व तंत्रज्ञानाचा अभ्यास करून भारतीय व कोकण रेल्वेला तसे तंत्रज्ञान पुरविण्यासाठी संबंधित देशाशी करार करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ येथे दिली.
कुडाळ स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या योजनांचा शुभारंभप्रसंगी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू बोलत होते. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे तसेच मान्यवर उपस्थित होते.
कोकण रेल्वेच्या वतीने प्रवासी सुखसोयी देताना सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करण्यात येत आहे. त्यामुळे सावंतवाडीत टर्मिनल, रत्नागिरीत लिफ्ट, सरकते जिने, पेडणे ते कारवार लोकल ट्रेन आणि पुढील दोन महिन्यांत सावंतवाडी ते कारवापर्यंत लोकल ट्रेन सोडली जाईल, असे रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले. रत्नागिरी ते सावंतवाडी रेल्वे स्टेशन व मार्गाला सुविधा देण्यात येईल तसेच सावंतवाडी आणि खेडला तिकीट आरक्षण सुविधा देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. माणगाव, सौंदळे येथे स्टेशनबांधणीचे घोषित केले.
कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण व दुपदरीकरणाला प्राधान्य देण्यात आले असून लकरच निधी उपलब्ध होईल. चिपळूण ते कराड आणि कोल्हापूर ते वैभववाडी या मार्गावर रेल्वे मार्ग सर्वेक्षण झाले आहे. तसेच जयगड, दिघी बंदरे रेल्वे मार्गाने जोडली जातील, असे सांगून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, कोकण रेल्वे कोकणी माणसाचे स्वप्न असून ते सत्यात उतरविण्यासाठी प्रवाशांना पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात असल्याचे सुरेश प्रभू म्हणाले.
मालवण, वेंगुर्ले व देवगड तालुके समुद्रकिनारी भागातील आहेत. कोकण रेल्वेचा मार्ग लांब पडतो. या तिन्ही तालुक्यांत प्रवाशांना रेल्वे तिकीट आरक्षणासाठी आरक्षण सेंटर मंजूर करण्यात येतील, असे सांगून सुरेश प्रभू म्हणाले, कोकण रेल्वेला अर्थसंकल्पात स्वतंत्र स्थान दिले जाईल. कोकण रेल्वेसाठी आठ हजार कोटी खर्च करून रेल्वेचा कायापालट केला जाईल, असे सुरेश प्रभू म्हणाले.
चीनमध्ये रेल्वेत गुंतवणूक अधिक आहे. तशा प्रकारची गुंतवणूक भारतीय व कोकण रेल्वेत झाल्यास मोठा बदल होऊ शकतो, असे रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले. कोकण रेल्वे पश्चिम-दक्षिण जोडल्या जाणार असून, सर्व रेल्वे स्थानकांच्या सुधारणांसाठी रेल्वे मंत्रालय कटिबद्ध आहे. जगभरातील बारा देशांत रेल्वेसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा विचार करून भारतीय कोकण रेल्वेत तशा सुधारणांसाठी संबंधित देशाशी करार करण्याचा विचार रेल्वेमंत्री प्रभू यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक राज्यात रेल्वेच्या विकासासाठी कंपनी निर्माण करून त्यात गुंतवणूक झाल्यास रेल्वेचा झपाटय़ाने विकास होऊ शकतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कंपनीसाठी होकार दर्शवून वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिल्याने राज्यातील रेल्वेच्या विकासासाठी आणखी मदत करेल, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.
पूर्व-पश्चिम रेल्वे मार्ग जोडण्यासाठी ८२ हजार कोटींचा प्रकल्प आहे, असे सांगून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मालगाडी वाहतुकीचा वेग वाढविला जाईल. कोकण रेल्वेला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पाठिंबा दिला आहे. कोकणी माणसावर अन्याय होणार नाही याची दक्षता रेल्वे मंत्रालय घेत असल्याचे रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले.
कोकण रेल्वे महामंडळ वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पिटल घेऊन विकास करण्याची तयारी दर्शवीत आहे. आता सेंट लुक्स हॉस्पिटल कोकण रेल्वे महामंडळाच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली पाहिजे. या रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा देण्याचा मानस सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. या वेळी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.