पुरोगामी समजल्या जाणा-या नगर जिल्ह्य़ात मुलींच्या जन्माचे प्रमाण आणखी घटले आहे. गेल्या वर्षी, सन एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण हजार मुलांमागे ९१८ होते. ते यंदा सन एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान ९१४ वर आले आहे. विशेष म्हणजे मुलींच्या जन्माचे प्रमाण आठशेहून कमी झाले आहे, अशी तब्बल जिल्ह्य़ात तब्बल ३२८ गावे आढळली आहेत. जिल्हा परिषदेने आता गाव घटक धरून, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा व आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.
एकात्मिक बाल विकास विभागाच्या पाहणीत हे भयाण वास्तव समोर आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. स्त्रीभ्रूणहत्या रोखून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्ह्य़ातून दाखल होणा-या अंगणवाडीतील शून्य ते सहा वयोगटांतील मुलांची व मुलींची माहिती संकलित करण्यात आली आहे, त्यातून ही माहिती उघड झाली आहे. याचा उपयोग यंत्रणेला स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीही होणार आहे.
राज्यात गावनिहाय माहितीचे संकलन प्रथमच झाले असावे. ज्या गावात मुलींच्या जन्माचे प्रमाण आठशेहून कमी आहे, अशा गावांच्या ग्रामसभांतून भ्रूणाचे लिंगनिदान करणार नाही, यासाठी ठराव करण्यासाठी प्रबोधन केले जाणार असल्याचे नवाल यांनी सांगितले. नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी गरोदर मातांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, त्यांच्या कुटुंबीयांचेही प्रबोधन केले जाणार आहे. या मोहिमेतून प्रसूती काळात होणारे माता व बालमृत्यूवर प्रबोधन करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत, त्यासाठी प्रत्येक बालमृत्यूच्या कारणाचे विश्लेषण केले जाणार असल्याचेही नवाल यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्य़ातील १ हजार ४६२ गावांतून ही माहिती संकलित करण्यात आली आहे. प्रत्येक गावात व वाडी, वस्तीवर किमान एक अंगणवाडी आहे, अंगणवाडीत शून्य ते सहा वयोगटांतील बालकांना व मातांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी माहिती संकलित केली जाते, त्या आधारावर हे वास्तव समोर आले आहे.
मुलींच्या जन्माचे प्रमाण नऊशेपेक्षा अधिक आहे, अशी केवळ ६६६ गावे आहेत. प्रमाण आठशे ते नऊशेच्या दरम्यान आहे, अशी ४६८ आहेत. प्रमाण आठशहूनही कमी आहेत अशी ३२८ गावे आहेत. अशा गावांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण चारशेहूनही कमी आहे असे केवळ अकोले तालुक्यातील १ गाव आहे, पाचशेहून कमी असणारी श्रीगोंद्यातील २, कर्जत व शेवगावमधील प्रत्येकी १ गाव, तर प्रमाण सातशेहून कमी असणारी ६३ गावे आहेत.
तालुकानिहाय गावांची संख्या
मुलींच्या जन्माचे प्रमाण आठशेहून कमी झाले अशा गावांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे: जामखेड ११, श्रीगोंदे २७, नगर तालुका १३, संगमनेर २२, कर्जत २४, कोपरगाव ९, पारनेर १२, शेवगाव २२, श्रीरामपूर ७, पाथर्डी १९, राहुरी १४, नेवासे २१, राहाता १० व अकोले २६. जि.प. यंत्रणेने या गावांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.