तरुणाईला प्रत्येक वेळी इतरांपेक्षा वेगळे आणि इतरांचे लक्ष वेधून घेणारे नवे काही हवेच असते. आता नव्या स्वरूपातील बुलेटचे आकर्षण तरुणाईला भुरळ घालणारे ठरले आहे. मात्र, बुलेट चालवताना लातुरात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बुलेट फटाका वाजवण्याकडे तरुणाईचा कल अधिक वाढल्याचे चित्र आहे.
बुलेटच्या फटाक्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या वा पायी जाणाऱ्यांच्या हृदयात मोठी धडकी भरावी, इतका कर्कश आवाज नव्या फटाक्याचा होत आहे. शोरूममधून बुलेट खरेदी केल्यानंतर काही मेकॅनिककडे जाऊन त्यात आवश्यक ते बदल घडविले जातात आणि इतरांपेक्षा वेगळे काही साध्य केल्याचा वेगळा आनंद लुटण्याच्या आविर्भावात रस्त्यावरून लग्नसोहळय़ात किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी ज्याप्रमाणे मोठय़ा आवाजात फटाके फोडले जातात, तसाच काहीसा आवाज चालत्या बुलेटमधून काढला जातो!
शहरातील शिवाजी चौकात गेल्या ३५ वर्षांपासून स्टार मोटारसायकल गॅरेजमध्ये काम करणारे मेकॅनिक मौलाना सय्यद म्हणाले, की काही मेकॅनिक बुलेटचे टायिमग वाढवून देतात. चालती गाडी बंद करून पुन्हा चालू केल्यानंतर मोठा आवाज होतो. या आवाजाचा आनंद घेण्याची नवी टूम बुलेटचालकांमध्ये आली आहे. असा आवाज केवळ बुलेटमध्येच निर्माण होऊ शकतो. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून लातूरमध्ये हे प्रकार वाढले आहेत. मात्र, आवाजामुळे इतरांना त्रास होण्याबरोबरच काही वेळा गाडीचे पिस्टन फुटून अपघात घडू शकतो. यात पसे मिळत असले तरी आपण असे काम करण्यास स्पष्ट नकार देतो, असे त्यांनी सांगितले. शहरात किमान एक हजारपेक्षा अधिक बुलेटधारक आहेत. यातील किमान ५० टक्के वाहनांमध्ये ही सुविधा करण्यात आली आहे. त्यासाठी दीड हजार रुपये अतिरिक्त खर्च केला जातो. बुलेटचालकांसाठी हा खर्च अगदीच किरकोळ आहे. या त्रासामुळे शहराच्या विविध भागांतील नागरिक त्रस्त आहेत.
लातूर शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी आपण असा प्रकार प्रथमच ऐकत आहोत, असे सांगून याबाबत माहिती घेऊन नियमानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शासकीय उत्तर दिले.