मुंबईकर खरं तर एका जादूई नगरीत राहतात, पण धकाधकीच्या आयुष्यामुळे निवांत उभं राहून या शहराचं सौंदर्य बघणं काही शक्य होत नाही. म्हणूनच मुंबईतल्या फोर्ट भागातल्या राजाबाई टॉवरपुढे उभं राहून इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा.. दोन भागांत..

मी विकास दिलावरी आणि आभा लांबा या दोघांना भेटले ती एका सुखद योगायोगानेच. यापैकी विकास हे स्टेण्ड ग्लास आणि जतनीकरण स्थापत्यशास्त्रातले तज्ज्ञ तर आभा रस्त्यांच्या स्थापत्यशास्त्रातल्या तज्ज्ञ. त्या वेळी मुंबईतल्या फोर्ट भागाच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. माझ्या औत्सुक्यापायी मी या दोघांना अनेक प्रश्न विचारले आणि त्यातूनच मला फोर्ट भागाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया बघायला मिळाली. या भागातल्या अप्रतिम गोथिक वास्तूंच्या पुनरुज्जीवनाचं काम, स्टेण्ड ग्लासच्या खिडक्या पुन्हा तयार करण्याचं काम एक ब्रिटिश पथक विकास दिलावरी यांच्या मदतीने करत होतं.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट

विकास संपूर्ण फोर्ट भागाच्या रूपावर काम करत होते. त्याच वेळी आभा फोर्टमधले मार्ग एकसारखे दिसावेत या हेतूने दुकानं आणि कार्यालयांच्या शिस्तबद्ध रचनेवर काम करत होती. फोर्टचं गतवैभव परत आणण्यासाठी चाललेल्या या कामातून खूप काही बघायला मिळालं. किती काळजीपूर्वक चाललं होतं ते काम. राजाबाई टॉवरसारख्या मुंबईची शान असलेल्या इमारतीत स्टेण्ड ग्लासचं काम किती अलवारपणे चाललं होतं.

दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरातल्या १४ प्राचीन गोथिक वास्तूंमधला मुकुटमणी समजला जातो, तो मुंबई विद्यापीठाच्या आवारातला राजाबाई टॉवर! ही वास्तू १४० वर्षांहून जुनी आहे. मार्च २०१२ मध्ये राजाबाई टॉवरचा समावेश युनेस्कोने तयार केलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भारतातल्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला. सध्या या यादीत ३५ स्थळांचा समावेश आहे. (यातली २७ सांस्कृतिक, तर सात नैसर्गिक आहेत, एक मिश्र स्वरूपाचं आहे.) विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळात गोथिक आणि आर्ट डेको इमारतींनी सजवण्यात आलेल्या या संपूर्ण परिसराचा समावेशच युनेस्कोने भारतातील जागतिक दर्जाच्या वारसास्थळांमध्ये केला आहे. इतिहासाचा हा जादूई तुकडा जतन करून ठेवण्यात याची खूपच मदत होणार आहे.

एकशेचाळीस वर्षांपूर्वी आपण मुंबईत दाट झाडीने वेढलेल्या मलबार हिलच्या लाटांनी भिजवलेल्या उतारावर उभे राहिलो असतो, तर आपल्याला अरबी समुद्राचं रमणीय दर्शन झालं असतं. आणि या समुद्राच्या पलीकडे नजर टाकल्यावर दिसल्या असत्या निळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर झेपावणाऱ्या गोथिक शैलीतल्या इमारती. एखाद्या चित्रात शोभाव्या अशा. मुंबईपासून हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिशांच्या राजधानीच्या-लंडनच्या गगनरेखेची प्रतिकृतीच बघतोय असा भास झाला असता.

या देखण्या ‘मिनी-लंडन’ची निर्मिती म्हणजे एका माणसाची स्वप्नपूर्ती होती. सर बार्ट्ल फ्रेअर १८६४ मध्ये मुंबईत- त्या वेळच्या बॉम्बेत आले ते बॉम्बे इलाख्याचे गव्हर्नर म्हणून. आजही मुंबईत त्यांच्या नावाचा मार्ग आहे. सर फ्रेअर ओळखले जायचे त्यांच्या चौकटी मोडणाऱ्या कल्पनांसाठी. एकोणिसाव्या शतकाच्या साठाव्या दशकापर्यंत भारतात ब्रिटिश राजवटीने भक्कम पाय रोवले होते याची त्यांना कल्पना होती. मराठय़ाची किंवा काही मुस्लीम राज्यकर्त्यांची थोडी भीती होती, तीही आता नाहीशी झाली होती. अशा परिस्थितीत ब्रिटिशांनी मुंबई बेटाच्या दक्षिण टोकाला बांधलेले बुरुज आणि तटबंद्या आता निव्वळ शोभेपुरत्या उरल्या होत्या. मग या तटबंद्या आणि बुरुजांच्या ठिकाणी देखण्या सार्वजनिक इमारतींचा समूह उभा राहिला तर या भागाची स्कायलाइन त्यांच्या लंडनच्या स्कायलाइनसारखीच दिसू लागेल, असा विचार त्यांनी केला.

सर बार्ट्ल फ्रेअर यांचं मिनी-लंडनचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यामागे आणखीही काही कारणं होती. ब्रिटनला कापड गिरण्यांसाठी अमेरिकेतून कापूस आयात करणं भाग होतं. भारतात अमेरिकेच्या तुलनेत खूप अधिक कापसाचं उत्पादन होत होतं आणि भारतातून कापूस आयात करणं स्वस्तही होतं. औद्योगिक क्रांतीमुळे ब्रिटनमध्ये उद्योगांना जोरदार चालना मिळाली होती आणि १८६३ मध्ये सुएझचा कालवाही व्यापारासाठी खुला झाला होता. भारतात १८५३ मध्ये सुरू झालेल्या रेल्वेने औद्योगिक प्रगतीचा प्रवास सुरू करून दिला होता. भारत आणि ब्रिटनमधल्या या व्यापाराच्या या नवीन संधीचा लाभ घ्यायला अनेक व्यापारी उत्सुक होते.

सर जमशेदजी जिजीभॉय हे त्या काळातल्या व्यापाऱ्यांमध्ये अग्रणी होते. सर जिजीभॉय, जगन्नाथ शंकरशेट, डेव्हिड ससून, सर प्रेमचंद रायचंद आणि सर जहांगीर रेडिमनी यांसारखे अनेक मोठे उद्योजक नवीन मुंबईच्या जडणघडणीत योगदान देण्यास उत्सुक होते. सरकारच्या सहकार्याने नवीन मुंबईची बांधणी झालेली त्यांना हवी होती. या सर्वानी सरकारी जमिनीवर वास्तू बांधल्या आणि सर बार्ट्ल फ्रेअर यांचं स्वप्न साकार झालं.

सर फ्रेअर यांना ब्रिटिश फोर्ट परिसरात ज्या इमारती हव्या होत्या, त्यात दोन रेल्वे टर्मिनस (यापैकी व्हिक्टोरिया टर्मिनस अर्थात सध्याचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट आहेच.), एक रुग्णालय, एक महाविद्यालय, एक सार्वजनिक सभागृह, टपाल कार्यालय, कलाशाळा, बँक, न्यायालय, सुसज्ज वाचनालय व एक मनोरा असलेला विद्यापीठ परिसर, सचिवालय, नव्याने कार्यान्वित झालेल्या नगरपालिकेसाठी इमारत, एक वाचनालयाची इमारत आणि एक देखणं चर्च यांचा समावेश होता. शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून या आराखडय़ात काही अतिरिक्त, पूरक इमारतींचीही तरतूद होती.

या वास्तूंच्या भोवताली विस्तीर्ण हिरवीगार आवारं होती, वृक्षांच्या पंक्ती होत्या. सर फ्रेअर यांच्या भव्यतेच्या संकल्पनेला साजेशा ओव्हल, क्रॉस आणि आझाद मैदानांसारख्या जागा होत्या. ब्रिटनमधल्या स्थापत्यकलेच्या परंपरांचं ज्ञान असलेल्या प्रख्यात ब्रिटिश वास्तुविद्यातज्ज्ञांवर या रिव्हायवल-गोथिक शैलीतल्या वास्तू बांधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यात भारतीय स्थापत्याच्या काही वैशिष्टय़ांचा उपयोग करून अनोखी शैली तयार करणं अपेक्षित होतं.

आजही शहराची शान असलेला राणीचा लखलखता रत्नहार अर्थात मरिन ड्राइव्ह समुद्रात भराव घालण्यापूर्वीच बांधण्यात आला होता. मुंबईतला फोर्ट परिसर लिट्ल लंडन भासला तर कित्येक महिने समुद्रात प्रवास करून येणाऱ्या ब्रिटिश जहाजांवरच्या कर्मचाऱ्यांचा होमसिकनेस थोडा कमी होईल, असाही विचार फ्रेअर यांनी केला होता.

सर बार्ट्ल फ्रेअर यांच्या कल्पनेतल्या या शहरामधल्या १४ वास्तूंपैकी सर्वात देखणा आहे, तो मुंबई विद्यापीठ परिसरातला घडय़ाळाचा मनोरा आणि वाचनालयाची इमारत. अर्थात याबद्दल कोणाचं मत वेगळं असू शकेल. राजाबाई टॉवर बांधण्यासाठी अर्थसाहाय्य पुरवलं उद्योजक सर प्रेमचंद रायचंद यांनी. त्यांच्या आईच्या नावावरून टॉवरला राजाबाई हे नाव देण्यात आलं. सर रायचंद यांनी तब्बल चार लाख रुपयांची देणगी या कामासाठी दिली होती आणि ब्रिटिशांनी टॉवर आणि वाचनालयाच्या इमारतीचं बांधकाम वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्यावर भरभक्कम व्याजही लावलं होतं. हे बांधकाम पूर्ण होण्यास १३ र्वष लागली. प्रख्यात ब्रिटिश वास्तुविद्यातज्ज्ञ सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांनी राजाबाई टॉवरची रचना केली. लंडनमधल्या बिग बेन टॉवरशी राजाबाई टॉवरची तुलना केली जाते. स्कॉट स्वत: भारतात आले नाहीत. मात्र, त्यांनी तयार केलेल्या आराखडय़ावरून स्थानिक वास्तुविद्यातज्ज्ञ आणि बांधकामतज्ज्ञांनी (यात भारतीय आणि ब्रिटिश दोन्ही होते) हे काम करून घेतलं. भारतातल्या गरजांना अनुसरून काही बदलही त्यात केले. भारतात उपलब्ध असलेल्यांपैकी सर्वोत्तम बांधकाम साहित्य यासाठी वापरण्यात आलं.

राजाबाई टॉवरला सात मजले असून, तो ८५.३७ मीटर उंच आहे. आजूबाजूच्या इमारतींच्या तुलनेत तो ३६.५९ मीटर अधिक उंच आहे. अनेक वर्षे राजाबाई टॉवर ही मुंबईतली सर्वात उंच वास्तू होती. या वास्तूवर बरंच शिल्पकाम केलेलं आहे. कोनाडे आणि छतांमधल्या चारही बाजू शिल्पकामाने सजवण्यात आल्या आहेत. हे सर्व काम उत्तम दर्जाच्या पोरबंदर दगडात करण्यात आलं आहे. पश्चिम भारतातल्या २४ जमातींचं चित्रण यात आहे. होमर आणि शेक्सपीअरच्या अजरामर साहित्यातली शिल्पं प्रवेशस्तंभांवर आहेत. वळणावळणांच्या जिन्यावर घुमटाकार छत आहे आणि पूर्वेकडच्या मोठाल्या स्टेण्ड ग्लासच्या खिडक्यांतून जिन्यावर प्रकाश येतो. दोन जिन्यांमधल्या सपाट जागेत प्राण्यांची शिल्पं कोरलेली आहेत. टॉवरवरचं चार बाजू असलेलं घडय़ाळ १८८० मध्ये सुरू झालं. ३.८ मीटर व्यासाचं हे घडय़ाळ एके काळी मुंबईतलं सर्वात मोठं घडय़ाळ होतं. या घडय़ाळाच्या महाकाय तबकडीखाली ठेवलेल्या गॅसच्या दिव्यांनी तिच्यावर प्रकाश पडत असे. घडय़ाळात १६ प्रकारचे स्वर वाजवण्यासाठी १६ घंटा आहेत. यापैकी सर्वात जड घंटा तीन टनांची. हे स्वर खास ब्रिटिश राजवटीतले होते. रुल ब्रिटानिया, ब्रिटनचे राष्ट्रगीत, गॉड सेव्ह द क्वीन वगैरे. अलीकडेच रायचंद कुटुंबाने सर प्रेमचंद रायचंद तसंच त्यांच्या आई राजाबाई यांची चित्रं देणगीरूपाने दिली. ती आता प्रवेशदालनात लावण्यात आली आहेत.

– विमला पाटील

sayalee.paranjape@gmail.com

– भाषांतर – सायली परांजपे

chaturang@expressindia.com