लंडनमधील २०१४ मधील मुक्कामात आलेला एक मजेदार अनुभव! आम्ही सकाळी साडेनऊच्या सुमारास फिरायला बाहेर पडलो होतो. उन्हाळ्याचे दिवस असले तरी थंडी होतीच. त्यामुळे कोवळे ऊन उबदार वाटायचे. ‘साउथ हॅरो’ स्टेशनपाशी आम्ही आलो आणि त्याच वेळी पादचाऱ्यांसाठी असलेला सिग्नल हिरवा झाल्याने काही लोक रस्ता ओलांडून अलीकडच्या फुटपाथवर आले. त्यात एक उंच, बांधेसूद अशी मध्यम वयाची निग्रो स्त्री होती. तिने आम्हाला आधीपासूनच हेरले असावे. आम्ही जवळ येताच तिच्या खडय़ा आवाजात तिने आम्हाला म्हटले. ‘‘यू आर द फर्स्ट एशियन कपल आय हॅव ऑब्जव्‍‌र्ह्ड वॉकिंग हँड इन हँड ऑन द रोड. आय रियली अ‍ॅप्रिशिएट यू अँड काँग्रॅच्युलेट यू फॉर दॅट.’’

आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो आणि तिचे आभार मानले. ती म्हणाली, ‘‘ज्या ज्या वेळी मी आशियायी जोडपे पाहते, त्या वेळी नवरा पुढे चालत असतो आणि बायको त्याच्या मागून दहा फूट अंतर ठेवून येत असते. असे का, हे मला कळले नाही.’’

‘‘तुझे निरीक्षण फारच चांगले आहे. असे असते हे खरेच आहे. आशियायी बायका थोडय़ा लाजाळू असतात खऱ्या.’’ मी म्हणाले.

‘‘तुम्ही एकमेकांचे नवरा – बायको आहात, मग एकमेकांचा हात धरून चालण्यात लाज कसली? तुम्ही त्यात कमीपणा मानायचे काय कारण? तुम्ही कुणाचा काही अपराध तर करत नाही. गॉडसमोर आणि नातलगांसमक्ष तुम्ही लग्न केले आहे. इथल्या लोकांसारखे तुम्ही वागा असे मला म्हणायचेच नाही. पण हात धरण्यात अडचण कसली?’’

माझ्या नवऱ्याने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तिची एक्स्प्रेस जोरात सुटली होती. तिने त्यालाच माझ्या कमरेभोवती एका हाताचा विळखा घालून चालण्याचे सुचवले. मलाही जवळ घेत हात कसे डौलात पकडायचे, त्याचे प्रात्यक्षिक दिले. एवढय़ात तिची बस येताना दिसली, मग मात्र गडबडीने बस पकडण्यासाठी धावली. बस हलली, तेव्हा तिने आम्हाला खिडकीतून पुन्हा एकदा बजावले आणि बाय् केले.

तिने असे बजावले तरी आम्ही काही दरवेळी फिरताना एकमेकांचे हात धरून चालत नव्हतो. पण एकदा पदपथावरून चालताना त्यावरील एका फरशीचे टोक चांगले दोन-तीन सेंटी मीटरवर आलेले होते. बोलण्यात व्यग्र असल्याने माझे तिकडे लक्ष गेले नव्हते. मग व्हायचे तेच झाले. मला जोराची ठेच बसली आणि पुढे फेकल्यासारखा माझा तोल गेला. प्रसंगावधानाने म्हणा की प्रतिक्षिप्त क्रियेने म्हणा. मी पटकन नवऱ्याचा दंड पकडला. पण मला मिळालेल्या गतीमुळे मी गर्रकन् फिरून त्यांच्या पुढय़ात आले आणि बचावले. आपल्या शेजारून चालत असलेली बायको एकदम जोरात पुढे कशी काय उभी ठाकली हे त्यांना क्षणभर समजलेच नाही. पण माझ्या मात्र लक्षात येऊन चुकले की आताच्या क्षणी ‘फार वाईट परिस्थिती’ होण्यापासून आपण वाचलो आहोत. परदेशात फ्रॅक्चर वगैरे झाले असते तर कुठल्याच दृष्टीने परवडणारे नव्हते.

तेव्हा एक  निश्चय केला. त्या अनामिक निग्रो बाईने सांगितल्यानुसार हातात हात धरूनच चालायचे. हाच प्रघात आम्ही भारतात परतल्यावरही चालू ठेवला. पण त्याबद्दल शेलके टोमणेही ऐकायला मिळाले. प्रत्येक देशाची संस्कृती निराळी हे तर खरेच. पण यामागे ‘लोक काय म्हणतील’ ही भीतीच सर्वाच्या मनात असते, असे दिसते. एकदा एका दागिन्यांच्या दुकानातून एक ज्येष्ठ जोडपे खाली उतरताना दिसले. पायऱ्या बऱ्याच होत्या आणि बाईंना त्या अतिशय जड जात होत्या. पण त्यांचे ‘हे’ खाली उतरून गेले आणि पायऱ्यांकडे पाठ करून उभे राहिले. ती सुरक्षितपणे उतरतेय की नाही किंवा तिला इतर कुणाची मदत मिळवून देणे शक्य आहे का ते पाहणे त्यांना सुचले नाही. त्यांच्याही मनात तेच असेल का?  – ‘लोक काय म्हणतील?’

गंमत म्हणजे पती-पत्नीने इतरांदेखत एकमेकांशी बोलायचेदेखील नसते ही पूर्वीची प्रथा आता मोडीत निघाली आहे. संभाषण ‘अहो ऐकलत का’ याऐवजी ‘अरे ऐकायला येतंय ना तुला?’ या पद्धतीचे झाले आहे. अगदी पूर्वीच्या काळात नवऱ्याकडे कुणी आले तर ‘पगडी खुंटीवर नाही’ असे मोघम उत्तर, नवऱ्याचा उल्लेख टाळून स्त्रिया परक्या व्यक्तीस देत असत. पण आता दुसरं टोकही ऐकायला मिळतं.  ‘‘तो कुठे रात्री आठशिवाय उगवतोय?’’ असे उत्तर येऊ शकते. मिक्स क्लब, मिक्स पाटर्य़ा वगैरेही चालतात. पण हातात हात घेण्याबाबत मात्र अजूनही ‘सोवळेपणा’ आहे.

काही वेळा ती शारीरिक मर्यादांमुळे ‘गरज’ बनली असली तरीही! ही मोठीच आश्चर्यजनक गोष्ट आहे. कुणाला व्हर्टिगोचा त्रास सुरू झाल्यामुळे एकटय़ाने चालण्यातला आत्मविश्वास गेलेला असतो, कुणाचे गुडघे दुखत असतात तर कुणाच्या पायातल्या लिगामेंटला एकदम संपावर जायची सवय लागलेली असते. अशा परिस्थितीत दोघांपैकी एकाने आपल्या जोडीदाराला आधार दिला, तर ती आनंदाची गोष्ट आहे. ‘या वयात काय हे?’ असे म्हणून टीका करण्याची नव्हे.

तसेही ज्येष्ठांचे सारे आयुष्य इतरांसाठी खस्ता खाण्यातच गेलेले असते. कुणाच्या शिक्षणासाठी आपल्या हौशींनाच काय गरजांनाही कात्री लावा, तर कधी कुणाच्या लग्नासाठी कर्जाची ओझी वाहा अशा गोष्टींमुळे एकमेकांबरोबर कुठे सहलीला किंवा फिरायला जाणे तर सोडाच, पण एकमेकांशी मोकळेपणी बोलणेही होत नाही. पुढे मुला-बाळांची लग्ने झाली की त्यांना स्वातंत्र्य, मोकळीक मिळावी यासाठी आटापिटा! मग सौभाग्यवती स्वत:ला तीन-चार भगिनी मंडळात वेगवेगळ्या वारी अडकवून घेते आणि श्रीयुत मोफत कार्यक्रमांमध्ये गर्दीत कुठेतरी जाऊन बसतात. मुले, सुना नोकरी करणारी असतील किंवा परदेशात असतील तर मोठा काळ सतत कामांमध्ये भिरभिरणारी ही माणसे एकटी पडतात. अशा वेळी नैराश्यग्रस्त होण्यापूर्वीच त्यांनी एकमेकांना हात देऊन स्वत:चे अनुरंजन होईल अशा कार्यक्रमांना हजेरी लावली पाहिजे.

खरे तर उतरत्या वयातच एकमेकांना खरी गरज असते जोडीदाराच्या साथीची. त्यासाठी आपल्या जोडीदाराला काही शारीरिक मर्यादा असतील तर त्याला बाहेर जाण्यास उद्युक्त करून स्वत: आधार देणारा पती किंवा पत्नी असेल तर त्यांना नावे का ठेवायची? ‘आज काठी नाही वाटतं बरोबर?’ किंवा ‘हे काय आज एकटय़ाच?’ अशी तिरकस चौकशी करण्यापेक्षा ‘क्या बात है.. आज तब्येत छान दिसतेय तुमची..’ असा कौतुकाचा शेरा त्यांना आनंद देईल.

बाहेर तरुणाई ज्या प्रकारे वागत असते त्याबद्दल ब्र काढण्याची कुणात हिंमत नसते. मग ज्येष्ठांनाच कालबाह्य़ नियमांनी जखडून का टाकायचे? आणि त्यांनी तरी ते का मनावर घ्यायचे? हसून सोडून द्यावे झाले! आणि ‘तिला’ म्हणावे, ‘कर हा करी धरिला..’

जयश्री कुलकर्णी

jayashreekulkarni@gmail.com