चित्रपटांमधून असभ्य शब्द वापरण्यावरून सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी घेतलेला पवित्रा आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना अभिनेता आमिर खान याने सेन्सॉर बोर्डावर जोरदार टीका केली. चित्रपटातील किंवा माध्यमांमधील कुठल्याही आशयावर बंदी घालणे योग्य नाही, असे आमीरने सांगितले. मनोरंजन उद्योगाच्या उलाढालींचा वेध घेणाऱ्या ‘फिक्की फ्रेम्स’चे उद्घाटन बुधवारी आमिर खानच्या हस्ते करण्यात आले.
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी काही असभ्य, चुकीच्या शब्दांची यादी जाहीर करून त्यांच्या चित्रपटातील वापरावर बंदी घातली होती. मात्र, त्यांच्या निर्णयाला सर्व स्तरातून झालेल्या विरोधामुळे बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला. या संदर्भात आपण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेतली. तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशी कुठलीही यादी दिलेली नाही. सेन्सॉर बोर्ड हे चित्रपटांना प्रमाणित करण्याचे काम करते, बंदी घालण्याचे नाही असे स्पष्टीकरण खुद्द मंत्र्यांच्याच तोंडून ऐकल्यानंतर आपल्याला समाधान वाटल्याचे आमिरने सांगितले. लोकांना चित्रपटातील एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून त्यावर सरसकट बंदी घालणे हा त्याच्यावरचा उपाय नाही, असे आमिरने सांगितले.
२०१३ मध्ये अभिनेता कमल हसन यांच्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी कामाच्या व्यापामुळे कमल हसन यांच्या मदतीला आपण जाऊ शकलो नाही. मात्र, त्यावेळी एक इंडस्ट्री म्हणून आम्ही सगळ्यांनी कमल हसन यांना पाठिंबा द्यायला हवा होता. चित्रपटावरच्या बंदीला कडाडून विरोध करायला हवा होता. मात्र, आपण तसे करू शकलो नाही, याबद्दल खंत व्यक्त करत आमिरने त्यांची माफी मागितली. एकदा चित्रपट प्रमाणित झाल्यानंतर तो लोकांना कुठलीही भीड न बाळगता पाहता यावा ही त्या त्या राज्याची जबाबदारी असल्याचे मत आमिरने व्यक्त केले. मात्र, काहीवेळा लोक स्वत:च कायदा हातात घेत बंदीचा पुकारा करतात हा दुर्दैवी प्रकार असल्याचे आमिरने सांगितले.