‘शोले’ चित्रपटातील गब्बर नावाचा दरोडेखोर घोड्यावर स्वार होऊन गावात शिरताच गावकऱ्यांची पळापळ होत असे. आता पुन्हा एकदा गब्बर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. परंतु, या गब्बरचे आगमन होताच भ्रष्टाचाराची कृत्ये करणाऱ्यांची पळापळ होताना दिसणार आहे. बॉलिवूडचा खिलाडी, बॉस अशी बिरुदावली भूषविणारा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार ‘गब्बर इज बॅक’ या आगामी चित्रपटात गब्बरचे प्रमुख पात्र साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त असलेला अक्षय रिक्षेतून प्रवास करताना नजरेस पडला. वेगळ्या धाटणीचे व्यावसायिक चित्रपट करणारा अक्षय चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अनोख्या कल्पना राबवत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. कालच प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील शीर्षक गीतातील “बुरे काम का बुरा नतिजा… सुधर जा… वरना गब्बर आ जायेगा” या संवादाने गब्बरच्या दराऱ्याची अनुभुती येते. चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाल्यापासून अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी चर्चेला सुरुवात झाली असून, चित्रपट पाहाण्यासाठी ते आतुर असल्याचे जाणवते. एका अन्य मुलाखतीच्या ठिकाणी जाताना रिक्षेतील प्रवासादरम्यान ‘गब्बर’ अक्षयने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. बऱ्याच काळानंतर रिक्षेतून प्रवास केला असल्याचे अक्षयने म्हटले आहे. यावेळी चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री श्रृती हसनसुद्धा त्याच्याबरोबर होती.