यंदा २०१५मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘बेबी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना आणखीन एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्स’च्या संग्रहालयाने नीरज पांडे दिग्दर्शित बेबी चित्रपटाच्या पटकथेस कायमस्वरुपी संग्रहित करण्यासाठी त्याची अधिकृत निवड केली आहे. विद्यार्थी, दिग्दर्शक, लेखक, कलाकार आणि चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्या व्यक्तींना अभ्यास करण्याकरिता ऑस्कर लायब्ररीमध्ये चित्रपटांचा समावेश केला जातो. १९१० सालापासून आत्तापर्यंत या लायब्ररीत ११ हजारांपेक्षाही जास्त चित्रपटांचा आणि कथांचा समावेश आहे.
दहशतवाद्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ आणि त्याचा बीमोड करण्यासाठी स्पेशल टीमचे प्रयत्न, त्यांचीही काम करण्याची पद्धत या गोष्टी सिनेमाच्या चौकटीत बसविण्याचा वास्तववादी प्रयत्न करणारी दिग्दर्शकीय शैली दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे मांडली होती. भूषण कुमार, विक्रम मल्होत्रा यांची निर्मिती असलेल्या बेबी या चित्रपटात अक्षय कुमार, अनुपम खेर, राणा डग्गुबती यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.