जम्मू आणि काश्मिरमध्ये आलेल्या महाभयंकर पुराने हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन कमालीचे व्यथित झाले आहेत. पुरामुळे जम्मू आणि काश्मिरमधील जनतेचे झालेले नुकसान भरून निघण्यासारखे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पुरात २०० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावले. काश्मिरमधील पुराची दृष्ये तेथील भयानक परिस्थितीची आणि जनता सोसत असलेल्या हालआपेष्टांची जाणीव करून देतात. जम्मू आणि काश्मिरमधील पुरामुळे झालेले नुकसान शब्दांत वर्णन करणे कठीण असल्याचे मत बिग बींनी सोशल मीडियावर व्यक्त केले. ते पुढे म्हणतात, जम्मू आणि काश्मिरमध्ये अडकलेले आणि पुरातून वाचलेल्यांची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमच्याकडून होईल तितका सहयोग आम्ही देत आहोत… या स्वर्गासारख्या भूमीचे पुरामुळे झालेले महाभयंकर नुकसान कशानेही भरून काढणे कठीण आहे. शाहरूख खान, फरहान अख्तर आणि अनुपम खेरसारख्या अन्य बॉलिवूड कलाकारांनीसुद्धा जम्मू आणि काश्मिरमध्ये पूरामुळे झालेली जीवितहानी आणि विध्वंसाबाबत काळजी व्यक्त केली.