बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका कवितेमुळे अडचणीत सापडले आहेत. अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेली कविता आपली असून त्यांनी ती दुसऱ्याच्याच नावाने खपवली असल्याचा दावा डॉ. जगबीर राठी यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी अमिताभ यांनी १५ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे आणि एक कोटी रुपयांची भरपाईदेखील द्यावी, अशी मागणी राठी यांनी केली आहे.
बिग बी अमिताभ बच्चन फेसबुक व ट्विटर या सोशल नेटवेìकग साइट्सद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्यास पसंती देत असले तरी आता याच साइटवरील शेअर केलेली पोस्ट बिग बींसाठी डोकेदुखी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी विकास दुबे व्यक्तीच्या नावाने ‘कोर्ट का कुत्ता’ ही कविता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाऊंटवर टॅग करण्यात आली होती. अमिताभ यांनीदेखील ही कविता विकास दुबेंच्याच नावाने शेअर केली. ‘माझा फॉलोअर विकास दुबे यांची आणखी एक मार्मिक कथा’ असे त्यांनी कविता शेअर करताना म्हटले.
अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून हरयाणातील महर्षी दयानंद विद्यापीठातील युथ वेल्फेअर विभागाचे संचालक जगबीर राठी यांना धक्काच बसला. राठी यांनी २००६ मध्ये ‘माटी का चूल्हा’ हे पुस्तक लिहिले असून याच पुस्तकात ‘कोर्ट का कुत्ता’ ही कविता लिहिली आहे. जगबीर राठी यांनी अमिताभ बच्चन आणि विकास दुबे या दोघांनाही ई-मेल पाठवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. परंतु त्यावर दोघांकडूनही अपेक्षित उत्तर न मिळाल्याने राठी यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे.