मुलींच्या अनाथालयात माझं नेहमीचं जाणं व्हायचं. पण वृद्धाश्रमात मी कधी गेले नव्हते. साधारण दोन वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये शूटिंग करत असताना तापडिया यांनी त्यांच्या ‘जीवनबाई तापडिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या ‘मातोश्री वृद्धाश्रमा’ला भेट देण्याचं मला निमंत्रण दिलं आणि मी ते स्वीकारलं. घरापासून लांब वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येणं खरंच वाईट..! मी एकत्र कुटुंबात वाढलेली. इतरांच्या कुटुंबाप्रमाणे आम्हीही सुख-दु:खं अनुभवली. पण म्हणून कधी आमच्या कुटुंबातली व्यक्ती कुटुंबापासून वेगळी झाली नाही. ज्या ज्येष्ठांच्या प्रेमावर आणि संस्कारांवर घर उभं राहतं, त्यांनाच वृद्धाश्रमात राहायला लागावं यासारखं दुर्दैव नाही. मला स्वत:ला आजी-आजोबा या नात्याचं प्रेम जास्त मिळालं नाही. दोन्ही आजोबा माझ्या लहानपणीच गेले. वडिलांची आई बराच काळ आजारी होती. नंतर तिनंही आजारपणात जगाचा निरोप घेतला. आईची आई म्हैसूरला असते. तेव्हा तिचंही प्रेम कमीच मिळालं. म्हणून मग मी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना प्रेम आणि आनंद देण्यासाठी गेले.
gondkar-1साधारण दुपारच्या वेळेत मी मातोश्री वृद्धाश्रमाच्या एका वेगळय़ा विश्वात गेले. तिकडचे सगळेच आजी-आजोबा हे त्यांच्या त्यांच्या कामात बिझी होते. दुपारची वेळ असल्यानं जेवणाची तयारी चालू होती. काही आज्या स्वयंपाक करत होत्या.. कोणी कोपऱ्यात आवराआवरी करत होत्या, तर काही पुरुषमंडळी इतर कामं करत होती. सगळे जण आपलं काम मस्त एन्जॉय करत होते. तेवढय़ात एका आजीनं मला ‘टीव्ही-सिनेमात काम करते का गं..’ असं विचारलं. मी ‘हो’ म्हणाले. त्यावर दुसरीला त्या आजी म्हणाल्या, ‘बघ मी म्हटलं होतं ना.. टीव्हीवालीच आहे..!’ जरा हसू आलं.. तापडियांनी माझी ओळख करून दिली आणि मग त्यांची ओळख मीच करून घेऊ लागले. मी सर्वाची विचारपूस करत होते. काही जण भरभरून बोलत होते. त्यांचा नित्य दिनक्रम सांगत होते. तर काही जणांना माझ्या येण्यानं काही फरक पडला नव्हता. मला त्यांच्याविषयी जरा अधिक कोडं पडलं होतं. पण त्याआधी मी ही संस्था चालते कशी हे जाणून घेतलं. हे वृद्धाश्रम पद्मा तापडिया स्वत: हँडल करतात. गेली अनेक वर्षे ही संस्था अविरतपणे काम करत आहे. या संस्थेचा निधी तापडिया स्वत: उभा करतात. पंधरा वर्षांपूर्वी एकदाच सरकारकडून मदत मिळाली. मदत बंद झाली. पण हे कार्य थांबलं नाही. इथं दर पंधरा दिवसांनी सर्वांचं मेडिकल चेकअप होतं. वय जास्त असल्यानं प्रत्येकालाच काही ना काही आजार आहेच. त्यामुळे त्यांच्या मेडिकेशनचा सर्व काही खर्च संस्थाच उचलते. इथं कोणताही वृद्ध हा पैसे भरून येत नाही.
मला असं वाटायचं, की वृद्धाश्रमात सोडून गेल्यावर मुलं वरचेवर आई-वडिलांना भेटायला येत असतील, पण तिथं गेल्यावर कळलं, की इथल्या वृद्धांना सोडायला आलेली त्यांची मुलं पुन्हा तोंड दाखवायलाही फिरकली नाहीत. इथं बाहेरचा कोणी माणूस भेटायला येत नाही आणि इथला माणूस बाहेर जात नाही. एवढय़ा वर्षांत अनेक वृद्ध या वृद्धाश्रमातून बाहेर गेले ते जगाचा निरोप घेऊनच. ७० जणांचे अंत्यसंस्कार तर संस्थेतील लोकांनीच केले. पोटची पोरं साधी अंत्यसंस्कारालाही आली नाहीत, हे कळालं, तेव्हा माझं काळीज चिरत तळपायाची आग मस्तकाला गेली.
gondkar-2आई-बाप नकोसे वाटणाऱ्या आणि त्यांना उतारवयात सोडून देणाऱ्या मुलांना आई-बापांनीच वाऱ्यावर सोडून दिलं असतं तर काय झालं असतं..?? रॅट रेसमध्ये स्टेटस मिळविण्यासाठी आपण पैशाच्या मागे लागतो आणि पैशाच्या मागे धावता धावता आपली नाती, संस्कार तोडून टाकतो. आज आपल्या आई-वडिलांना आपण वृद्धाश्रमात पाठवतो आणि मुलांना पाळणाघरात..! कशासाठी..??? वन बीएचकेच्या जागी टू बीएचके हवा म्हणून, की टू व्हीलरऐवजी फोर व्हीलर यावी म्हणून..?
मी प्रेम देण्यासाठी गेले होते, पण भरभरून प्रेम मिळवत होते. त्यांचं मला जवळ घेणं.. हक्कानं खायला घालणं.. सगळं सगळं मी पाणावलेल्या डोळय़ांनी अनुभवत होते. त्याच वेळी माझी नजर कोपऱ्यात बसून शून्यात पाहणाऱ्या आजींकडे गेली. मघाशी पडलेलं कोडं आता उलगडलं. अंगाखांद्यांवर खेळवलेल्या मुलांनी असं उघडय़ावर टाकल्यानं त्या इतक्या कठोर निर्विकार झाल्यात याची कल्पना आली. नुसत्या कल्पनेनंच मला दरदरून घाम फुटला. मी कोणाशी काही न बोलता अचानक निघाले. थरथरत्या अंगानं मी तिथून निघाले आणि थेट पुण्याला आईकडे गेले. तिला जाताच घट्ट बिलगले आणि नकळत धाय मोकळून रडायला लागले. तिलाही काही उमजेना. नंतर मी सविस्तर सांगितलं तेव्हा आईनं मला शांत केलं.
या वृद्धांना वेळेशिवाय दुसरं काही नको असतं. आपण आपल्या माणसांशी चार गोष्टी बोलावं एवढी माफक अपेक्षा असते त्यांची. पण तीही पूर्ण करण्यात लोक अपयशी ठरतात आणि वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते. वृद्धाश्रमात कोणी जाऊ नये यावर सोल्युशन काय हे मला माहीत नाही, पण मला वाटतं, की आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी वृद्धाश्रमाला भेट द्यावी आणि समोर असणाऱ्या व्यक्तींच्या जागी आपले आई-वडील किंवा स्वत:ला इमॅजिन करावं. तसं झालं तर कोणाचंच आपल्या आई-वडिलांना स्वत:पासून दूर ठेवण्याचं डेअरिंग होणार नाही.
‘मातोश्री’सारख्या अनेक संस्था आज काम करत आहेत. त्यांना गरज आहे ती आपल्यासारख्यांची..!! अशा संस्थांना मदत करणारे अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत. त्यातल्या कित्येक जणांची नावं आपल्याला माहीतही नसतात. नुकतंच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांना मदत केल्याचं ऐकलं असेल. पण ते दोघे याशिवायही अनेक संस्थांना मदत करतात, हे फार कमी जणांना माहीत आहे. सयाजी शिंदेंनी तर एक गावच दत्तक घेतल्याचं मी ऐकलं होतं. आमटे कुटुंबीयांनी तर आपलं जीवनच समाजसेवेसाठी समर्पित केलंय. समाजातील अनेक लोक मग ते फिल्म स्टार्स असो किंवा दुसरे कोणी. अनेक जण छोटय़ामोठय़ा प्रमाणावर सामाजिक काम करत असतात. त्यांच्याकडून आपणही काही इन्स्पिरेशन घ्यायला हवं. आपल्या घासातला घास देऊन.. आपला मदतीचा हात पुढे करून आपणच आपला समाज पुढं नेऊ शकतो. तुम्हीही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या संस्थांना मदतीचा हात द्या आणि या कार्याला पुढं घेऊन जा. तुम्हाला ‘मातोश्री’ वृद्धाश्रमासाठी मदत करायची असेल तर ०२४०- २३७९१११ किंवा ९८५०६०७८१८ या क्रमांकांवर संपर्क करू शकता. तुमच्या मदतीचा हात त्यांच्या आनंदाची साथ असेल.
– स्मिता गोंदकर

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
mithun chakraborty son namashi calls him mithun
मिथुन चक्रवर्तींना नावाने हाक मारतात त्यांची मुलं, कारण सांगत लेक नमाशी म्हणाला, “आम्ही वडिलांना…”
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स