मालिकेतली आजीबाई म्हटली की, ती देवघरात बसून देवदेव करणारी हे समीकरण ठरलेले असते. पण ‘कलर्स’वरील ‘बालिका वधू’ मालिकेतील दादीसाने हे समीकरण बदलले. घरामध्ये जिच्या हुकूमाशिवाय पानही हलत नाही तीच दादीसा आता ‘स्कूल चले हम’च्या सुरात सूर मिसळत गणवेश घालून चक्क शाळेत जाणार आहे!
मालिकेच्या एका भागामध्ये घरातील सुनेला साप चावतो. त्यावेळी घाबरुन जाऊन दादीसा ताबडतोब जुन्या पद्धतीने तोंडाने रक्त काढण्याचा प्रयत्न करते. यात सुनेसोबत तिलाही दवाखान्यात भरती व्हावे लागते. या प्रसंगावरुन आपण काळाच्या मागे पडलो आहोत, हे दादीसाला लक्षात येते. त्यामुळे पुन्हा एकदा शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार ती करते. आता एकदा दादीसाने ठरवले म्हणजे, काही केल्या ती मागे हटणार नाही, हे नक्की. त्यामुळे शाळेचा पोशाख घालून ती शाळेत हजरही होते. याआधी आनंदीने आजीला शिक्षणाशी तोंडओळख करुन देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी दादीसाला मिळाली नव्हती. आता मात्र चालून आलेली ही संधी सोडायची नाही हे तिने बहुतेक ठरवले असावे.
मालिकेच्या सुरवातीला शिस्तप्रिय आणि जुन्या विचारांच्या दादीसाला घरी बालवधू बनून आलेल्या आनंदीने बदलत्या जगाची ओळख करुन दिली होती. त्यानुसार काळाच्या पावलावर पाऊल टाकत, दादीसाने स्वत:मध्ये अनेक बदल घडवून आणले. त्यातीलच एक पाऊल म्हणजे ही शाळेची वारी आहे. योगायोग म्हणजे याचदरम्यान दादीसा गावातल्या निवडणुकीमध्येही उभी आहे, त्यामुळे तिच्या या निर्णयाचा निवडणुकीमध्ये नक्कीच सकारात्मक परिणाम होणार आहे.
दादीसाची भूमिका साकारणाऱ्या सुरेखा शिक्रीच्या सांगण्यानुसार, ‘शिकण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. आपल्याला कळायला लागल्यापासून खरेतर आपल्या शिक्षणाला सुरवात होते. त्यामुळे कोणत्याही वयात शिक्षणाची लाज वाटून मागे हटायची गरज नाही.’ मालिकेने याआधी बालवधूच्या गंभीर विषयावर भाष्य केले आहे, आता शिक्षणाच्या मुद्दय़ाला हात घालून प्रौढ शिक्षणाची प्रेरणा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आता घरातली जिद्दी, हट्टी दादीसा जेव्हा मुलांसोबत शाळेत जाऊन बसेल, तेव्हा काय-काय धमाल उडेल हे पाहण्यासारखे असेल.