‘सरस्वतीचंद्र’ या टीव्हीवरील मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता गौतम रोडे याने अधिकाधिक चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वत:ची वेबसाईट सुरू केली आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, मी अगोदरपासूनच टि्वटरवर असून, येथील माझा अनुभव फार छान आहे. टि्वटरवर चाहत्यांकडून मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे मला उभारी मिळते. जास्तीतजास्त चाहत्यांपर्यंत पोहोचता यावे आणि त्यांची प्रतिक्रिया, सल्ला, प्रेम आणि सहाय्य मिळावे यासाठी स्वत:ची वेबसाईट आणि फेसबूक पेज असावे, ही कल्पना मला सुचली. याशिवाय फेसबूकवर त्याच्या नावाने अनधिकृत पेज असल्या कारणानेदेखील त्याने http://www.iamgautamrode.com या स्वत:च्या वेबसाईटची निर्मिती केली आहे. गौतमच्या मार्गदर्शनाखाली त्याला सहाय्य करणारा चमू या वेबसाईटची काळजी घेणार आहे. चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी धावपळीच्या जीवनशैलीतून वेळ काढणार असल्याचेदेखील गौतम म्हणाला.