काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाहिनीवरून सादर झालेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका खूप गाजली. डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजी महाराज हे एक समीकरणच बनले. त्यांची ही लोकप्रियता लक्षात घेऊन आता पुन्हा एकदा ते शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत. अर्थात या वेळी ते महाराजांच्या भूमिकेसोबतच संभाजी महाराज आणि सूत्रधार/निवेदकाची भूमिकाही पार पाडणार आहेत.
डॉ. कोल्हे यांचे रंगभूमीवरील पुनरागमन हे नाटकाच्या माध्यमातून नव्हे तर नृत्याविष्कार असलेल्या एका कार्यक्रमातून होत आहे. जगदंब प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ‘भगवा’ या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग १४ जुलै रोजी होणार आहे. विलास सावंत व विजय राणे यांची निर्मिती असलेला हा कार्यक्रम भगव्या ध्वजाविषयी आहे.
भगवा ध्वज हा हिंदू धर्म /भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. भगव्या ध्वजाचे महत्त्व या कार्यक्रमात नृत्याविष्कारातूनउलगडणार आहे. विवेक आपटे यांची संकल्पना आणि विजय राणे यांचे दिग्दर्शन असलेल्या या कार्यक्रमातील ११ गाणी विवेक आपटे यांनीच लिहिली आहेत. याचे संगीत आदी रामचंद्र यांचे आहे. नरेश लिंगायत यांनी नृत्यदिग्दर्शन केले असून ५० कलाकारांचा सहभाग या नृत्याविष्कारामध्ये आहे. कार्यक्रमाचे भव्य नेपथ्य प्रदीप पाटील यांचे आहे.