अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७ वे अधिवेशन ३ ते ५ जुलै या कालावधीत लॉस एंजलिस येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून विवेक रणदिवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अधिवेशनाचे समन्वयक शैलेश शेटय़े, संजीव कुवाडेकर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
तीन दिवसांच्या कालावधीत साहित्य, नाटय़, संगीत, कलाविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संगणकतज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांचे ‘नव्या विचारांची दिशा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची संगीत मैफल, ‘गोष्ट तशी गमतीची’ आणि ‘लग्न पाहावे करून’ या दोन नाटकांचे प्रयोग, मराठी चित्रपटांना शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘गोष्ट एका काळाची काळ्या पांढऱ्या पडद्याची’, अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचा ‘कथा कोलाज’ आदी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
द्वारकानाथ संझगिरी (मला भेटलेले लिजंड्स), सत्यजित पाध्ये (बोलक्या बाहुल्या), अतुल कुलकर्णी (सेतू बांधू या) यांच्यासह क्रिकेट समालोचक हर्ष भोगले अधिवेशनातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
ज्येष्ठ नागरिक, अमेरिकेतील मराठी डॉक्टर, मराठी माणसाला उद्योगप्रिय बनविण्यासाठी चर्चासत्र, बिझनेस
एक्स्पो, अमेरिकेतील मराठी माणसांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
‘मैत्र पिढय़ांचे जपे वारसा कला, संस्कृती मायबोलीचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या या अधिवेशनाला अमेरिकेतील सुमारे ५ हजार मराठी मंडळी सहभागी होणार आहेत.
अधिवेशनातील विविध कार्यक्रमात भारतातून ७५ कलाकार उपस्थित राहणार असल्याचेही शेटय़े व कुवाडेकर म्हणाले.